इमामांसोबतच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांचा दावा
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात वक्फ कायद्याविरोधात निदर्शने सुरूच आहेत. याचदरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ कायद्याबाबत इमामांसोबत बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वक्फ कायद्याच्या माध्यमातून केंद्रावर निशाणा साधला आहे.
मुर्शिदाबाद जिह्यातील काही भागात वक्फ कायद्याविरोधात जोरदार निदर्शने झाली होती. यादरम्यान वाहने व घरांची जाळपोळ झाल्यानंतर हिंसाचार निर्माण झाला होता. यासंबंधी जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच वक्फ हिंसाचारात टीएमसीचा सहभाग असता, तर आपल्या नेत्यांच्या घरांवर हल्ला झाला नसता, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. या हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार असून बीजेपी आणि बीएसएफने संगनमताने दंगली घडवून आणल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. बुधवारी नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या इमाम आणि मुएझिनच्या मेळाव्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा आरोप केला. हा पूर्वनियोजित सांप्रदायिक हिंसाचार आहे. दंगलखोरांना चिथावणी देऊन अशांतता निर्माण केली गेली आहे. जर तृणमूलने हे सर्व केले असते तर तृणमूल खासदार आणि आमदारांच्या घरांवर हल्ले झाले नसते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संसदेत वक्फ कायद्याविरुद्धच्या लढाईत तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे, भाजपने पैसे दिलेले काही मीडिया हाऊस बंगालला बदनाम करण्यासाठी इतर राज्यांमधील हिंसाचाराचे व्हिडिओ प्रसारित करत आहेत, असेही त्या पुढे म्हणाल्या. केंद्र सरकारने किती तरुणांना नोकऱ्या दिल्या याचे उत्तर द्यावे. ‘औषधे, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत, पण काही ‘गोदी मीडिया‘ फक्त बंगालविरुद्ध बोलतात, अशी आगपाखडही त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेस जिथे जिंकली तिथे हिंसाचार : ममता
वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात झालेल्या निदर्शनांवेळी मुर्शिदाबादमधील ज्या भागात हिंसाचार झाला तो प्रत्यक्षात मालदा लोकसभा मतदारसंघात येतो. ही जागा काँग्रेसने जिंकली आहे. काँग्रेसने ही हिंसक परिस्थिती नियंत्रित करायला हवी होती, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. भाजपशी संबंधित काही मीडिया चॅनेल बंगालचे बनावट व्हिडिओ दाखवतात. आम्ही त्यांना पकडत कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानमधील 8 व्हिडिओ दाखवले आणि बंगालला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा मुद्दा उपस्थित केल्याचेही त्यांनी सांगितले.
एनआयएकडून चौकशीची मागणी
मुर्शिदाबादमधील हिंसाचारामुळे बाधित झालेल्या कुटुंबांनी कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टी. एस. शिवज्ञानम यांच्या खंडपीठाकडे राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) हिंसाचाराची चौकशी करण्याची विनंती केली आहे. एवढेच नाही तर विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी हिंसाचारग्रस्त धुलियानला भेट देण्याची परवानगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दोन्ही प्रकरणांची सुनावणी लवकरच उच्च न्यायालयात होऊ शकते.