Harshwardhan Sapkal : दंगलींच्या आडून महाराष्ट्राची लूट, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप ; सद्भावना शांती मोर्चाचा समारोप
esakal April 17, 2025 11:45 AM

नागपूर : ‘सध्या सत्ता टिकविण्यासाठी दंगली घडविल्या जात आहेत व या दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटला जात आहे,’ अशी परखड टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज येथे केली. व्यापाऱ्यांचे भले करून शेतकरी-कामगारांना वाऱ्यावर सोडले जात असल्याचाही आरोप करत सपकाळ यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.

शहरात सामाजिक सौहार्द व शांतता नांदावी यासाठी काँग्रेसने काढलेल्या

सद्भावना शांती मोर्चाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि इतर नेते उपस्थित होते. सपकाळ म्हणाले, ‘‘आपल्याला एकजुटीने सद्भावनेच्या मार्गाने जावे लागणार आहे. राज्यघटनेचा शिव-शाहू-फुले- आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जायचे आहे आणि राहुल गांधी यांचे ‘मोहब्बत की दुकान’ उघडायचे आहे. सत्तेसाठी काही लोक भावाभावांत, जाती-पातीत भांडणे लावत आहेत. राज्यातील जमिनी उद्योगपतींना दिल्या जात आहेत.’

’ सत्तेसाठी अशांतता पसरवणाऱ्यांनी जाती-धर्मात, भावाभावांत भांडणे लावू नये, असे आवाहन सपकाळ यांनी केले. ‘‘दिल्ली आणि मुंबईत कठपुतळीचा खेळ सुरू आहे. त्यामुळेच अशांतता पसरवली जात आहे. आजच्या दंगली या महाराष्ट्र लुटण्यासाठी, जमिनी उद्योगपतींना देण्यासाठी केल्या जात आहेत. या दंगलींचे प्रायोजक कोण? व्यापाऱ्याचे चांग भले केले जात आहे. शेतकरी, कामगारांना मदत करण्यापेक्षा हिंसाचार केला जात आहे. नागपूरला दंगलीचा इतिहास नाही. अशा शहराची शांतता भंग करण्यात येत आहे. सरकारचे अपयश लपविण्यासाठी हिंसाचार घडविला जात आहे,’’असा आरोप सपकाळ यांनी केला.

सपकाळ म्हणाले
  • देशात सद्भावनेचा ऱ्हास

  • ही वेळ एकत्रितपणे लढण्याची आहे

  • सद्भावना वृद्धींगत होत नाही तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत

  • स्वातंत्र्याच्या विरोधात लढणारे आता सत्तेत

  • इंग्रजांना मदत करणारे, विषमतेचे विष कालवणारे देशात आग लावण्याचे काम करीत आहेत

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात आग लावणारे लोक सत्तेत आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उकरून काढत राज्यात तेढ निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. नागपूर हिंसाचार प्रकरणानंतर एका आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवून घर पाडले. सर्वोच्च न्यायालयाने महायुती सरकारवर ताशेरे ओढले आहेत. हे लाजीरवाणे आहे.

- विजय वडेट्टीवार, विधानसभेतील काँग्रेस नेते

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.