Supreme Court India : सरन्यायाधीशपदी न्या. भूषण गवई
esakal April 17, 2025 11:45 AM

नवी दिल्ली : न्या. भूषण रामकृष्ण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्यायाधीश होतील. येत्या १४ मे रोजी ते सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत. ज्येष्ठतेत अव्वल असलेले न्या. गवई यांच्या नावाची परंपरेनुसार आपले उत्तराधिकारी म्हणून विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केंद्र सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाकडे शिफारस केली आहे. न्या. गवई हे भारताचे सहावे मराठी भाषक सरन्यायाधीश असतील.

न्या. गवई यांच्याआधी आतापर्यंत न्या. प्रल्हाद गजेंद्रगडकर, न्या. यशवंत चंद्रचूड, न्या. शरद बोबडे, न्या. उदय लळित आणि न्या. धनंजय चंद्रचूड या मराठी न्यायाधीशांना सरन्यायाधीश होण्याचा सन्मान लाभला आहे. न्या. चंद्रचूड यांच्यानंतर ५ महिने आणि ५ दिवसांनी सरन्यायाधीशपदाची सूत्रे गवई यांच्या रूपाने पुन्हा मराठी भाषक न्यायाधीशांकडे येणार आहे. गेल्या साडेचार वर्षांत सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारणारे ते चौथे मराठी भाषक न्यायाधीश ठरतील. न्या. गवई यांचा कार्यकाळ १६० दिवसांचा असेल. त्यांच्या कार्यकाळादरम्यान २६ मे पासून १४ जुलैपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे अंशकालीन कामकाज चालेल. न्या. गवई हे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी निवृत्त होतील.

आत्तापर्यंतचे महाराष्ट्रातील सरन्यायाधीश

- न्या. प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर (१ फेब्रुवारी १९६४ ते १५ मार्च १९६६, २ वर्षे ४२ दिवस),

- न्या. यशवंत विष्णू चंद्रचूड (२२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५, ७ वर्षे १३९ दिवस),

- न्या. सॅम पिरोज भरुचा (१ नोव्हेंबर २००१ ते ५ मे २००२, १८५ दिवस),

- न्या. सरोश होमी कपाडिया (१२ मे २०१० ते २८ सप्टेंबर २०१२, २ वर्षे १३९ दिवस),

- शरद बोबडे (१८ नोव्हेंबर २०१९ ते २३ एप्रिल २०२१, १ वर्ष १५६ दिवस),

- न्या. उदय लळित (२७ ऑगस्ट २०२२ ते ८ नोव्हेंबर २०२२, ७३ दिवस),

- न्या. धनंजय चंद्रचूड (९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४, २ वर्षे १ दिवस)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.