रंगांची निवड
esakal April 17, 2025 11:45 AM

स्मिता शेवाळे - अभिनेत्री

जिज्ञासू वृत्तीमुळे आपल्या ज्ञानात सतत भर पडत असते. सध्या मी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या माझ्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी फिरते आहे. या प्रवासामध्ये अशीच एक जिज्ञासू व्यक्ती माझ्या बरोबर आहे. आमच्या चित्रपटात काम करणारी मुक्ताई म्हणजे नेहा. तिला खूप प्रश्न पडतात. तिच्याकडे बघितलं, की मला माझ्या करिअरच्या सुरुवातीचे दिवस आठवतात. मला सुरुवातीला जेव्हा प्रश्न पडायचे, तेव्हा या चित्रपटसृष्टीतल्या दिग्गज लोकांनी मला सढळपणे मदत केली. मला आठवतंय, मी जेव्हा पहिली कार घेतली तेव्हा मुंबईतले रस्ते हे अर्थातच माझ्यासाठी खूप नवीन होते. मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग्जना जायचं म्हटलं, तर त्या वेळेला आत्तासारखे गुगल मॅप नव्हते.

मग दिल्या गेलेल्या पत्त्याचा कागद बरोबर घ्यायचे आणि कोणाकोणाला विचारत त्या स्थळी पोहोचायचे. त्यावेळी मला आठवतंय आमची ‘लाली मावशी’ म्हणजेच उज्ज्वला जोगनं मला एके दिवशी शूटिंगला येताना मुंबईचा नकाशा घेऊन यायला सांगितला होता. त्या नकाशावरून तिनं मुंबई पूर्व, पश्चिम शिवाय साऊथ मुंबई कशी आहे हे नीट समजावून सांगितलं आणि रस्त्यांची ओळख करून दिली. त्यानंतर आपल्याला किमान आता मुंबई माहिती आहे हा आत्मविश्वास घेऊन मी ड्राईव्ह करत होते. अशी ही माणसं मला लाभली, म्हणून खरंतर या क्षेत्रामध्ये माझा निभाव लागू शकला. आज नेहाला जे प्रश्न पडतात ते अर्थातच मेकअप, स्किन केअर रिलेटेड असतात. तिला पडणाऱ्या प्रश्नातून आजचा हा लेख मी लिहिते आहे.

आपण कुठल्या रंगाचे कपडे निवडावेत, किंवा कुठल्या रंगाच्या लिपस्टिक्स निवडायच्या, असे तिचे दोन प्रश्न होते. मला असं वाटतं, बऱ्याच जणांना अशा पद्धतीचे प्रश्न पडत असतात. रंगसंगतीचा विचार योग्य रीतीनं केल्यास आपण नक्कीच उठावदार दिसू शकतो यात शंका नाही. सादरीकरण उत्तम होईल अशा गोष्टींची निवड व्हायला हवी. ज्वेलरी, कपडे, फॅब्रिक, रंगसंगती या सगळ्यांचा विचार केल्यास सौंदर्यात निश्चितपणे भर पडतो. म्हणून याचा अगदी प्राथमिक अभ्यास करणं गरजेचं असतं. आपल्या त्वचेचा रंग कुठला आहे असं म्हटल्यानंतर सावळा, गव्हाळ, गोरा असं जुजबी आपण सांगू शकतो; परंतु एवढंच मर्यादित नसून आपल्या त्वचेचा रंग तीन प्रकारांमध्ये वर्गीकृत केला जातो. ज्यामुळे आजकाल फॅशन इंडस्ट्रीमध्ये कुठला रंग सूट करेल हे ठरवतात.

आपण आपल्या मनगटावरच्या नसा तपासून त्याप्रमाणे आपला अंडर टोन काय आहे हे ठरवू शकतो. उदाहरणार्थ, थंड (cool), उबदार (warm), न्यूट्रल असे प्रकार आहेत. तुमच्या मनगटावरील नसा या निळसर किंवा जांभळ्या दिसत असतील, तर तुमचा अंडरटोन थंड (cool) आहे. त्या हिरवट दिसत असतील, तर उबदार (warm) अंडरटोन आहे. ओळखणं कठीण जात असेल, मिश्रित दिसत असेल तर न्यूट्रल आहे असं समजावं. चांदी तुमच्यावर उठून दिसत असेल, तर तुमचा अंडरटोन कूल असण्याची शक्यता आहे. सोनं शोभून दिसत असेल, तर (warm) अंडरटोन आहे. अशा प्रकारे आपण चाचणी करू शकतो. तुम्ही अगदी सहज टॅन होत असाल, तर तुमचा अंडरटोन हा उबदार असतो. निळे, करडे, हिरवे असे डोळे असतील किंवा तपकिरी, काळे केस असतील, तर थंड अंडरटोन असतो असं म्हणतात.

या अंडरटोनप्रमाणे आपल्याला कुठले रंग शोभून दिसतात हे आपण शोधू शकतो. शिवाय लिपस्टिक कुठली निवडावी हेही समजणं सोपं जातं.

  • थंड अंडरटोन (cool) : अशा लोकांना एम्ब्रोल्ड ग्रीन, सफायर ब्ल्यू, जांभळा, लॅवेंडर, बेबी ब्लू, ग्रे नेव्ही हे रंग छान दिसतात.

  • उबदार अंडरटोन (warm) : यांच्यावर तपकिरी ऑलिव्ह ग्रीन, अंबर कोरल, नारंगी, मस्टर्ड येलो हे रंग उठून दिसतात.

  • तुम्ही न्युट्रल असाल, तर तुम्हाला जवळपास सगळे रंग शोभून दिसतात. सौम्य आणि मॅचिंग शेड्स अधिक कुठून दिसतील.

  • अंडरटोन ओळखल्यास तुम्ही कपडे, मेकअप आणि ॲक्सेसरीज निवडताना अधिक स्मार्टली निर्णय घेऊ शकाल.

  • चुकीचा रंग तुमचा चेहरा थकलेला किंवा फिकट दाखवू शकतो, तर योग्य रंग तुमचे तेज वाढवते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.