ढिंग टांग
विश्वावसु संवत्सरातील चैत्रातील तृतीयेस घडलेली अभूतपूर्व घटना. सूर्यदेव अस्ताला गेला होता. दादरच्या समुद्रकिनाऱ्यावरील लाटांची गाज वाहतुकीच्या गदारोळात हरवोन गेली होती. शिवाजी पार्कातील गर्दी रोडावत गेली, आणि आसपासची हाटेले गजबजली. तेव्हाच ते घडले…
रों रों रोंरावत गाड्यांचा ताफा येवोन ‘शिवतीर्था’च्या पायथ्याशी थडकला. वास्तविक सूर्व्यादेव बुडाला की गडाचे दरवाजे हमेशा बंद होतात. परंतु, गाड्यांची तातडी बघोन शिबंदीवरील शिपायांनी लगोलग गडावर जावोन खाशांना वर्दी दिली, ‘‘राजियांचा विजय असो! ठाण्याचे सुभेदार नाथाजी शिंदे आले आहेती. आपली भेट मागताती!’’
काहीयेक हिशेब मनीं धरोन राजियांनी फर्मावले, ‘‘येऊ द्या त्यांस!’’
करकरत गडाचे दरवाजे उघडले. गाड्या आत गेल्या. ताडताड ताडताड ताडताड चालत (म्हंजे तसं नॉर्मलच, पण ऐतिहाशिक प्रसंगात कोणीही नॉर्मल चालत नसतंय! पहा : ‘छावा’ चित्रपटातील म्हातारा औरंगजेब.)
‘‘यावं यावं, अचानक येणं केलंत?’’ राजियांनी गंभीर मुद्रेने भरघोस स्वागत केले.
‘‘ अहो, असं काय करता? तुम्हीच बोलावलं म्हणून आलो!’’ हबकलेले नाथाजी शिंदे म्हणाले. बूट उगाच काढले, असा विचार त्यांच्या मनात मोज्यासारखा दरवळला. राजियांना अचानक ध्यानात आले की, इलेक्शनच्या जुझानंतर ‘ या एकदा’ असे त्यांनी पाची बोटांचा पाचुंदा ओठांशी नेवोन आवतण दिले होते. नाथाजींनी सीरिअसली घेतले…
‘‘हो हो, उद्या संकष्टी आहे, म्हणोन आजच बोलावले! चला, थेट थाळेच घेऊ!’’ राजियांनी विनंती केली. लगोलग मेजावर व्यंजने सजली. दालनात भोजनाचा सुगंध सुटला.
‘‘डिनर रेडी आहे,’’ ‘राइसप्लेट तयार आहे’ अशी मुंबईतील हाटेलांपुढे पाटी असते, तशा शैलीत राजियांनी घोषणा केली.
‘‘मी रात्री लंच आणि सकाळी डिनर घेतो, कॉमन मॅन होतो तेव्हापासून माझं अजूनही तेच रुटिन चालू आहे,’’ नाथाजींनी खुलासा केला.
‘‘आता तुम्ही डेसिकेटेड कॉमन मॅन आहात!,’’ खोबरे विळीवर खर्वडायची ॲक्शन करत राजियांनी शाब्दिक कोटी केली. नाथाजी बिलकुल हसले नाहीत. बेत अतिशय रुचकर होता. आमरस पुरी, वालाचे बिरडे, आंबोळ्या, अहा!!
‘‘आली वाटतं तुमची पेटी!,’’ नाथाजींनी आमरसाच्या वाटीकडे बघत अंदाज बांधला. त्यांना आंब्याची पेटी म्हणायचे असणार!!
‘‘सोडा हो पेट्या नि खोके! देवगडचा झाडपिक्या हापूस आहे, खा!,’’ राजियांनी वाटी तोंडाला लावत मल्लिनाथी केली. इथून पुढे उभयतांमध्ये बंद दाराआड चर्चा जाहली. या चर्चेत नेमके काय ठरले, हे मीडियातील सूत्रांना अजिबात कळले नसले, तरी आम्हास ते पक्के ठाऊक आहे, कारण आंबे पिळायला आम्हीच वाडगे घेऊन बसलो होतो. संभाषण झाले ते येणेप्रमाणे :
‘‘काय?’’ राजेसाहेब.
‘‘कुठं काय?’’ नाथाजी.
‘‘काय करायचं?’’ राजेसाहेब.
‘‘तुम्ही बोला!’’ नाथाजी.
‘‘कठीण आहे,’’ राजेसाहेब.
‘‘या जगात काहीही कठीण नाही. जोवर महाशक्ती आमच्या मागे उभी आहे, तोवर काहीही कठीण नाही!’’ नाथाजी. केवढी ही विलक्षण श्रद्धा!!
‘‘ आम्हाला टाळ्या द्यायला अनेक हात उत्सुक आहेत!,’’ राजेसाहेब.
‘‘द्या टाळी!’’ नाथाजी.
‘‘वाट्टेल त्याला टाळी देत नसतो आम्ही! टाळी द्यायला जावं तर ऐनवेळी समोरचा बगलेत हात दाबतो, असा अनुभव आला आहे, ’’ राजेसाहेब कडवटपणाने म्हणाले.
‘‘मुंबई आम्ही जिंकणार हे नक्की!’’ नाथाजी.
‘‘खीक!’’ राजेसाहेब.
‘‘मग काय तुम्ही जिंकणार?’’ नाथाजी.
‘‘बघाल!’’ राजेसाहेब.
‘‘खो खो…खोक..!’’ नाथाजी.
‘‘आटपा जेवण!’’ भांडीकुंडी आवरत राजेसाहेब.
‘‘निघालोच…बाय द वे, आमरस बरा होता, पण देवगडचा हापूस ओरिजिनल असावा लागतो!’’ नाथाजींनी अभिप्राय दिला. तो शिष्टाचाराला धरुन नव्हता, असे अनेकांना वाटले. चालायचेच.