अमरावती : स्टेट ऑफ आर्ट असलेल्या अमरावती विमानतळ आणि पायलट प्रशिक्षण केंद्रामुळे अमरावतीला विशेष ओळख प्राप्त होणार आहे. येत्या काळात सिंचन, पायाभूत सुविधा यासोबतच सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवान प्रवासाच्या सुविधा निर्माण करण्यात येतील. विदर्भातील विकासात्मक कामे पूर्ण करून या भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम प्राधान्याने केले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अमरावती विमानतळाचे उद्घाटन, तसेच प्रवाशी विमानसेवेचा शुभारंभ आणि एअर इंडिया पायलट प्रशिक्षण केंद्राच्या उड्डाणाचे प्रात्यक्षिक आज (16 एप्रिल) पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. (Devendra Fadnavis asserts that he will develop Vidarbha and bring it into the mainstream)
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या करारामध्ये विदर्भाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. यामुळे विदर्भाचे चित्र बदलले आहेत. समृद्धी महामार्ग जेएनपीटी आणि वाढवण बंदराला जोडण्यात येणार आहे. यासोबतच वैनगंगा-नळगंगा प्रकल्पात विदर्भातील सात जिल्ह्यांचा समावेश राहणार आहे. यातून दहा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने शेती करता येणे शक्य होणार आहे. प्रकल्पामुळे या भागाचा चेहरामोहरा बदलणार आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून विदर्भातील दुष्काळ कायमचा संपविण्यात येणार आहे. सिंचनाने कोरडवाहू शेती बागायती करण्यात येणार आहे. तसेच सहा हजार कोटी रुपये खर्च करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे.
हेही वाचा – मराठी : मुख्यमंत्रीपद न मिळाल्याचं शल्य; शिंदे पुन्हा म्हणाले, मी त्या विमानाचा पायलट होतो अन्…
विदर्भाच्या दृष्टिकोनातून अमरावती हे महत्त्वाचे स्थान आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. विमानतळामुळे आर्थिक क्रांती होणार असून या भागाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. तसेच रोजगाराच्या विविध संधी निर्माण होतील. विमानतळामुळे परिसराला नवी ओळख निर्माण होणार आहे. उद्योजकही विमानतळ असणाऱ्या भागाला प्राधान्य देऊन उद्योग उभारत असल्याने येथील टेक्सटाईल उद्योगाला चालना मिळेल. या ठिकाणी होऊ घातलेल्या पीएम मित्रा पार्कमुळे दोन लाख रोजगार निर्माण होणार असून कापूस ते कापड आणि पुढे फॅशनमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
आज या ठिकाणी विमानाचे पहिले उड्डाण होत असून भविष्यात रात्री विमान उतरण्याची सोय करण्यात येईल. यासोबतच नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर सकाळच्या सत्रातील विमान उड्डाणाची वेळ प्राधान्याने ठरविण्यात येईल. या ठिकाणी दक्षिण आशियामधील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यात एका वर्षात 180 पायलट तयार होतील. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 34 विमाने उपलब्ध असतील. भविष्यात विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येणार असून लवकरच पूर्ण क्षमतेने विमानतळ सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – Politics : राजकीय वर्तुळात शरद पवार आणि अजितदादांचीच चर्चा; 11 दिवसात तिसऱ्यांदा एकत्र येणार