Bangladesh Hindu Leader Killed : बांग्लादेशात काय चाललय? हिंदू नेत्याला हाल-हाल करुन मारलं
GH News April 19, 2025 12:11 PM

बांग्लादेशात अल्पसंख्यांक संकटात आहेत. तिथे अजूनही अल्पसंख्यांक समुदायाविरोधात हिंसाचार थांबलेला नाही. बांग्लादेशात अल्पसंख्यांक समुदायाला टार्गेट केलं जात आहे. तिथे सत्तापालट झाल्यानंतर अनेक हिंदुंची हत्या करण्यात आली. अनेक जेलमध्ये बंद आहेत. आता बांग्लादेशच्या उत्तरेला दिनाजपूर जिल्ह्यात हिंदू समुदायाच्या एका प्रमुख नेत्याला घरातून किडनॅप करण्यात आलं. अत्यंत निदर्यतेने त्याला मारहाण करुन त्याची हत्या करण्यात आली.

हिंदू नेता भाबेश चंद्र रॉय यांचा मृतदेह गुरुवारी मिळाला. पोलिसांनुसार, भाबेश चंद्र रॉय यांना किडनॅप केल्यानंतर काही तासात त्यांचा मृतदेह मिळाला. रॉय हे बांग्लादेश पूजा उडजापान परिषदेच्या बिराल विभागाचे उपाध्यक्ष होते. त्याशिवाय परिसरातील हिंदू समुदायात त्यांचा प्रभाव होता.

घराजवळ फेकून दिलं

भाबेश चंद्र रॉय यांच्या पत्नी शांतना यांच्यानुसार, गुरुवारी ते घरी होते. संध्याकाळी 4.30 च्या सुमारास त्यांना एक कॉल आला. रॉय घरी आहेत की नाही? हे जाणून घेण्यासाठी हा फोन कॉल आला होता, असा त्यांच्या पत्नीचा दावा आहे. आरोपींनी भाबेश चंद्र रॉय यांचं अपहरण करुन त्यांना शेजारच्या गावात घेऊन गेले. तिथे निदर्यतेने त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोर एका व्हॅनमधून आले व त्यांनी भाबेश यांना घराजवळ फेकून दिलं.

जखमी अवस्थेत पडून असल्याच कुटुंबियांनी पाहिलं

रॉय घराबाहेर जखमी अवस्थेत पडून असल्याच कुटुंबियांनी पाहिलं. ते लगेच त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी रॉय यांना मृत घोषित केलं. या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, आम्ही आरोपींचा शोध घेत आहोत. संशयितांची ओळख पटवून त्यांना अटक करण्य़ासाठी पोलीस काम करत आहेत.

हिंदुंवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले

बांग्लादेशात याआधी सुद्धा अशा घटना घडल्या आहेत. हिंदू कुटुंब आणि त्यांच्या घरांना लक्ष्य करण्यात आलं. शेख हसीना यांचं सरकार गेल्यापासून बांग्लादेशात हिंदुंवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भारताने वेळोवेळी निषेध नोंदवूनही अशा घटना कमी झालेल्या नाहीत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.