कुख्यात अतिरेक्यास अमेरिकेत अटक, ISI अन् BKI सोबत नाते, भारतात प्रत्यर्पणाची तयारी
GH News April 19, 2025 12:11 PM

भारतातील मोस्ट वॉन्टेड अतिरेकी हरप्रीत सिंह उर्फ हॅप्पी पासिया याला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. भारतातील अनेक गुन्ह्यात त्याचा हात होता. तो फरार होता. त्याला अटक करण्याची विनंती राष्ट्रीय तपास संस्थेने अमेरिकेतील एजन्सी एफबीआयला केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. एफबीआयने हरप्रीत सिंह याचे पाकिस्तान गुप्तचर संस्था आयएसआय (इंटर-सर्विसेज इंटेलिजेन्स) आणि खालिस्तान समर्थक आतंकी संगठन बब्बर खालसा इंटरनॅशनलसोबत संबंध असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत अवैधरित्या घुसलेला हॅप्पी भारतात दहशतवाद पसरवत होता. हॅप्पी यांचे भारतात प्रत्यर्पण करण्याची तयारी केली जात आहे.

भारतात हॅप्पीवर एकूण 33 गुन्हे

भारतात हॅप्पीवर एकूण 33 गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, टॉर्गेट किलिंग, ग्रेनेड हल्ले आणि बॉम्बस्फोट घडवण्याचे प्रयत्न असे अनेक आरोप आहेत. भारतात एनआयएने त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. पंजाबमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये तो भारताला हवा होता. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅक्रामेंटो शहरातून एफबीआय आणि ईआरओने संयुक्तपणे त्याला अटक केली. एफबीआयच्या मते, हरप्रीत दोन आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांशी संबंधित आहे आणि तो बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसला होता.

एफबीआय केले ट्विट

एफबीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले की, हरप्रीत सिंहचे पाकिस्तान गुप्तचर संस्था आयएसआय आणि खालिस्तानी आतंकी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनलशी तार जुळले होते. त्याला अटक करण्यासाठी भारतासोबत मिळून काम केले. तो कमीत कमी 16 दहशतवादी हल्ल्यात सहभागी होता. हॅप्पीच्या आई आणि बहिणीला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. ते कारागृहात आहे. त्यांच्यावर अजनाला पोलीस ठाणे उडण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने हॅप्पी याच्यावर 10 लाखांचे पारितोषिक जाहीर केले होते. त्याचे पाकिस्तानमध्ये असलेल्या खालिस्तानी आतंकवादी हरविंदर सिंह संधू उर्फ रिंदाशी संबंध आहेत. हे दोन्ही अतिरेकी ऑक्टोंबर 2024 मध्ये चंडीगढमध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्यातील आरोपी आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.