सोलापूर : जिल्हा परिषदेसह माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा सुरू आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वेळापत्रकानुसार २५ एप्रिल रोजी परीक्षा संपणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळा सुटी लागेल. तर १ मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर होईल आणि ३ मेपासून शिक्षकांना उन्हाळा सुट्या लागतील.
दरवर्षी शाळांकडून एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा घेतल्या जात होत्या. पण, शैक्षणिक वर्षात किमान २२० दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावे, असा नियम आहे. त्याचे पालन होत नव्हते. त्यामुळे यंदा प्रथमच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) सर्वच शाळांच्या अंतिम सत्र परीक्षेच्या तारखा दिल्या. त्यामुळे ८ ते २५ एप्रिलपर्यंत शाळांना अंतिम सत्राची परीक्षा घ्यावी लागली.
विद्यार्थ्यांनाही त्यातून वेगळा अनुभव मिळाला. आता फक्त शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासून विद्यार्थ्यांचे निकालपत्रक तयार करण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागणार आहे. दरवर्षीप्रमाणेच अंतिम सत्र परीक्षेचा निकाल १ मे रोजीच जाहीर करावा लागणार आहे. याशिवाय दरवर्षी निकाल जाहीर झाल्यावर शाळांना उन्हाळा सुटी लागते, पण रमजान ईदची सुटी जास्त झाल्याने शाळांची सुटी एक दिवस लांबणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.
१७ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुटी
२०२५ या शैक्षणिक वर्षातील दिवाळी १७ ते २३ ऑक्टोबरपर्यंत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळांना दिवाळीची १४ दिवस सुटी असणार आहे. १७ ते ३१ ऑक्टोबर या काळात विद्यार्थ्यांना दिवाळीची सुटी असेल. याशिवाय शैक्षणिक वर्षात ५४ दिवस सार्वजनिक सुट्या (प्रत्येक आठवड्यातील रविवार वगळून) असणार आहेत.
१५ जूनपासून शाळा सुरू होतील
चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र परीक्षा २५ एप्रिल रोजी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्या लागतील. त्यानंतर तेथून आठ दिवस शाळा सुरू राहतील आणि ३ मेपासून शिक्षकांना सुट्या असतील. नेहमीप्रमाणे १५ जूनपासून शैक्षणिक वर्षाची सुरवात होईल.
- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर जिल्हा परिषद