'ईएसआय'ची साथ; आजार दूर होईल खास !
esakal April 19, 2025 07:45 PM

अमोल शित्रे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १९ ः तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्ती आजारांनी त्रस्त आहे ? घरची परिस्थिती हालाखीची आहे ? महागड्या खासगी रुग्णालयांचा भरमसाठ खर्च परवड नाही ? मग, चिंता करू नका ! कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआय) रुग्णालयाला भेट द्या. तेथे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील आजारी व्यक्तीवर विनामूल्य औषधोपचार केले जातात. इतकेच नव्हे; तर गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियाही विनामूल्य केल्या जातात.
विविध आजारांनी ग्रस्त कामगारांवर कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआय) रुग्णालयांमार्फत मोफत उपचार केले जातात. मात्र, याबाबत कामगारांना अधिक माहिती नसल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. या रुग्णालयांकडून लाखो रुपयांची बिले आकारली जात असल्यामुळे कामगारांना खासगी सावकाराकडून हातउसने पैसे घेऊन खर्च भागवावा लागतो. कामगार रुग्णालयाकडून याबाबत जनजागृती केल्यास गरजू कामगारांना विनामूल्य उपचाराचा लाभ घेता येईल.
पिंपरी-चिंचवडला उद्योगनगरी आणि कामगार नगरी म्हणून संबोधले जाते. येथील राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागेतील कंपन्या, दहापेक्षा अधिक कामगार असणारे कारखाने किंवा आस्थापनांमधील कामगारांना वैद्यकीय सेवा सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने कर्मचारी राज्य विमा महामंडळाची कामगार रुग्णालये सुरू केली. कंपनीत काम करताना एखाद्या वेळी अपघात होतो. रात्रपाळीत काम केल्यामुळे कामगारांना गंभीर आजार होतात. तसेच कामाचा ताण पडून देखील त्यांना आजाराला सामोरे जावे लागते, अशा कामगारांना ईएसआय रुग्णालयांमार्फत विनामूल्य वैद्यकीय उपचार दिले जातात.
याशिवाय, गंभीर शस्त्रक्रिया देखील केल्या जातात. आर्थिक हालाखीची परिस्थिती असली तरी कामगारांना दर्जेदार उपचार घेऊन बरे होता येते. मात्र, बहुतांश कामगारांना ईएसआय रुग्णालयांमार्फत केल्या जाणाऱ्या उपचाराची अधिक माहिती नसते. त्यातच आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना महागडे उपचार परवडत नसल्याची भावना मनात घेऊन कामगार उपचार न घेताच गंभीर आजार अंगावर काढतात. वेळेत उपचार न घेतल्यामुळे अशा कामगारांचा बळी देखील जातो. त्यामुळे कामगारांनी सजग होऊन कामगार अर्थात ईएसआय रुग्णालयातच उपचार घेण्याची गरज आहे.

कोणत्या शस्त्रक्रिया विनामूल्य ?
कर्करोग, क्षयरोग, हृदयविकार, मूत्रपिंड प्रत्यारोपण, हर्निया, आंत्रपुच्छ, व्रण, स्त्रीरोग आणि प्रोस्ट्रेट रोग या गंभीर शस्त्रक्रिया चिंचवडच्या मोहननगर येथील कामगार रुग्णालयात विनामूल्य केल्या जातात. एमआयडासीत जड वस्तू उचलणे, ओझी वाहणे, मशिन चालवणे, रात्रभर उभे राहून काम करणे तसेच इतर कठीण कामे करणाऱ्या रुग्ण कामगारांनी या रुग्णालयात उपचार घेतल्यास गंभीर आजारापासून स्वतः सावरता येईल.

ईएसआय नियम कोणाला लागू ?
दहा किंवा त्याहून अधिक कामगार असलेल्या बिगर-हंगामी कारखान्यांना कर्मचारी राज्य विमा कायदा लागू होतो. कलम १ (५) नुसार, दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंटस, चित्रपटगृहे, वाहतूक सेवा, मीडिया, खासगी रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि कंत्राटी आणि कॅज्युअल कामगारांसह दहा किंवा त्याहून अधिक कामगारांना कामावर ठेवणाऱ्या महानगरपालिका संस्थांना देखील त्यात समाविष्ट करण्यात आले आहे. अशा आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ईएसआय योजनेतर्गत वैद्यकीय सेवेचा लाभ घेता येतो.

ईएसआय योजनेची वैशिष्टे
- विनामूल्य उपचार घेण्यासाठी ईएसआय दवाखान्यात किंवा रुग्णालयात भरती होणे आवश्यक
- विमाधारक व्यक्तींशिवाय, त्याच्यावर अवलंबून कुटुंबातील सदस्यांनाही विनामूल्य उपचार
- सेवानिवृत्त कर्मचारी, कायमस्वरूपी अपंग विमाधारक आणि त्यांच्या जोडीदाराला १२० रुपयांच्या वार्षिक हफ्त्यावर वैद्यकीय सेवा
- रुग्ण कामगार वैद्यकीय रजेवर असेल; तर त्याला एका वर्षातील जास्तीत जास्त ९१ दिवस वेतनाच्या ७० टक्के दराने रोख रक्कम
- प्रसूती रजेदरम्यान, प्रसूतीच्या बाबतीत २६ आठवड्यांपर्यंत आणि गर्भपात झाल्यास ६ आठवड्यांपर्यंत महिलांना सरासरी पगाराच्या १०० टक्के रक्कम
- विमाधारक कर्मचाऱ्याचा काम करताना मृत्यू झाला; तर त्याच्या कुटुंबीयांना मासिक निवृत्तिवेतन


ईएसआय योजने अंतर्गत केल्या जाणाऱ्या वैद्यकीय उपचारांची कामगारांना माहिती नसते. माहिती देताना अडवणूक होते. ईएसआय रुग्णालयात गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. पण, माहिती नसल्यामुळे कामगार आमच्यापर्यंत येत नाहीत. ते खासगी रुग्णालयात जातात. लाखो रुपये शुल्क भरून बरे होत नाहीत. त्यानंतर ते आमच्याकडे येतात. तोपर्यंत कामगारांना आजार आणि आर्थिक परिस्थितीतून होणाऱ्या यातना सहन कराव्या लागतात. कोणत्याही खासगी रुग्णालयात न जाता कामगार आमच्याकडे आल्यास त्यांच्यावर विनामूल्य उपचार केले जातील.
- डॉ. वर्षा सुपे, चिकित्सक अधीक्षक, ईएसआय रुग्णालय, मोहननगर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.