सांगली : ‘‘लाडक्या बहिणींना (ladki Bahin Yojana) दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. २ हजार १०० रुपये देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, ते लवकरच दिले जातील,’’ असे आश्वासन विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Deputy Speaker Neelam Gorhe) यांनी येथे दिले.
येथील दैवज्ञ भवनमध्ये (Shiv Sena) महिला मेळावा झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संपर्कप्रमुख सुनीता मोरे, जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, बजरंग पाटील, रावसाहेब घेवारे, संजय विभूते, ज्योती दांडेकर, रुक्मिणी आंबिगेर, अर्चना माळी, राणी कमलाकर, मनीषा पाटील, आशा पोतदार, विद्या गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘शिवसेनेने प्रतिकूल परिस्थितीत अनेक आंदोलने केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पर्व सुरू केले. या शिवसेनेला शिंदे गट न म्हणता शिवसेना म्हटले पाहिजे. निवडणूक आयोगाने आपल्याला चिन्ह आणि नाव दिले आहे. सांगलीत पुराच्या काळात एकनाथ शिंदे मदतीसाठी धावून आले होते. राज्यातील लाडक्या बहिणींना आणखी काही योजनांचा लाभ देता येईल काय, याची आखणी केली जात आहे. २१०० रुपये देण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ सेवा तक्रार प्राधिकरणाकडे पाठपुरावा करून जी मुले वृद्धांचा सांभाळ करत नाहीत, त्यांना मदत करावी.
बँकांमध्ये लाडक्या बहिणींना सन्मान मिळाला पाहिजे. ज्या बँका नीट वागणूक देत नाहीत, त्यांचा आढावा घेणार आहे. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ज्या बँका सहकार्य करत नाहीत, त्यांची माहिती द्यावी. महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्या. सभासद मोहीम राबवा.’’ यावेळी जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, बजरंग पाटील, रावसाहेब घेवारे यांची भाषणे झाली. सुनीता मोरे यांनी स्वागत केले.