नवी दिल्ली (पीटीआय) : येथील शक्तिविहार परिसरातील एक बहुमजली निवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये अकराजणांचा मृत्यू झाला अन्य अकराजण हे जखमी झाले आहेत.
आज पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), अग्निशामन दल, दिल्ली पोलिस आणि अन्य स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचाव कार्याला प्रारंभ केला होता. साधारणपणे वीस तासांहून अधिक काळ येथील बचाव कार्य सुरू होते. या दुर्घटनेमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेले नागरिक हे त्याच ठिकाणी वास्तव्यास होते अशी माहिती समोर आली आहे.
मृतांमध्ये या इमारतीचा मालक तेहसीन आणि त्याच्या सहा कुटुंबीयांचाही समावेश आहे. संबंधित इमारत ही वीस वर्षांहून अधिककाळ जुनी असल्याची माहिती पुढे आली आहे. या इमारतीच्या तळमजल्यामध्ये तीन ते तीन दुकानांच्या बांधणीचे काम सुरू होते त्यामुळे संबंधित इमारत कोसळली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.
स्थानिकांनीही हीच माहिती दिली. मागील अनेक वर्षांपासून या इमारतीच्या पायामध्ये नाल्याचे पाणी मुरत होते त्यामुळे तिची पाठ भिंत ही कमकुवत झाली होती अशी माहिती या भागातील अन्य रहिवासी सलीम अली यांनी माध्यमांशी बोलताना दिली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.