- स्मिता देव, smitah37@gmail.com
उन्हाळ्याची सुट्टी अगदी तोंडावर आहे. मुलांच्या परीक्षा म्हणजे त्यांच्यासाठी आणि पालकांसाठीही एक दिव्यच असतं! त्यामुळे दोघेही ताणात असतात. एकदाच्या परीक्षा संपल्या की मुलांच्या आधी पालकच ‘हुश्श’ करतात! मी शाळेत होते, तेव्हा आई परीक्षेच्या दिवशी न्याहरीला भरपूर काही तरी करायची.
तेही ‘हेल्थी नाश्ता’ प्रकारातलं! परीक्षेला जाण्यापूर्वी पोट अर्धं भरलेलं असावं, म्हणजे शांत वाटेल आणि परीक्षेचा पेपर चांगला जाईल, हे तिचं मत. ते माझ्या चांगलंच पथ्यावर पडायचं, कारण ‘परीक्षा म्हणजे खास न्याहरी’ हे समीकरण होऊन गेलं होतं. सहसा लहान मुलांना परीक्षेचा दिवस नको वाटतो, पण मी मात्र या दिवसांची वाट बघायचे.
परीक्षेचा निकाल काय असणार आहे, हे तर आधीपासूनच माहिती असायचं. शिक्षक माझ्या आई-बाबांना बोलावणार आणि म्हणणार, की ‘मुलीनं जरा चांगला अभ्यास केला तर बरे गुण मिळतील.’ त्यात काही बदल व्हायचा नव्हता! त्यामुळे माझं लक्ष असे परीक्षेच्या दिवशीच्या न्याहरीकडे. माझा आवडता मसाला डोसा किंवा कुरकुरीत पापुद्रा सुटलेला गरमागरम आलू पराठा...!
पुढे मी आई झाल्यावरही माझ्या मुलाच्या- युगच्या मागे कधी ‘पहिला नंबर हवा’ वगैरे लकडा लावला नाही. मी आणि अभिनयने (दिग्दर्शक अभिनय देव) त्याचा कल कुठेय हे पाहिलं आणि त्याला त्या दिशेनं जायला फक्त मदत केली. एक मात्र ठरलेलं होतं, की त्याची परीक्षा संपल्यावर मी आणि तो मिळून भरपूर स्वयंपाक करणार!
त्याला लहानपणापासून स्वयंपाकघरात लुडबुड करायला आवडायचं. आता तो चलचित्रणात करिअर करतोय, पण दर आठवड्याला मित्रांना मेजवानीसाठी बोलावून स्वत: करून वाढतो. मला नेहमी असं वाटत आलं आहे, की मुलगी असो वा मुलगा; आजच्या काळात प्रत्येकाला काही ठरावीक पदार्थ तरी करता यायलाच हवेत.
कुटुंबानं एकत्र मिळून स्वयंपाक करणं ही तर अगदी ‘फन ॲक्टिव्हिटी’ होऊन जाते! मी, अभिनय आणि युग हे करायचो. शनिवारी संध्याकाळचं जेवण किंवा रविवारचं ‘ब्रंच’, असं तिघांनी मिळून बनवायचो. असं करताना मुलांना नवीन नवीन कल्पना सुचतात आणि आपण आपले अनुभवाचे बोल सांगून त्यांना मदत केली, तर त्यातून काही तरी भन्नाट पदार्थ तयार होतो.
अशा एका रात्रीच्या जेवणात युगने ‘रोस्टेड कॉलिफ्लॉवर’ आणि परतलेल्या गाजरांची एक नवीनच ‘डिश’ केली. त्याबरोबर त्यानं फ्रेंच फ्राइज केले. त्याला जोड म्हणून मी ‘पनीर खुरचन’ आणि ‘मटर पालक’ हे पदार्थ केले. अभिनयने आम्हाला सगळ्या भाज्या चिरून दिल्या.
त्या दिवशी इतकी गंमत आली होती; ती युग तर विसरणार नाहीच, पण आमच्याही कायम लक्षात राहील. आज मी त्याच संस्मरणीय रेसिपीज् तुम्हाला सांगणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांबरोबर असं काही तरी करायला काय हरकत आहे! माझ्या अनुभवावरून सांगते; तुम्हालासुद्धा खूप मजा येईल.
‘इंडियन स्टाइल’ रोस्टेड कॉलिफ्लॉवर, परतलेली गाजरे आणि फ्रेंच फ्राइज
साहित्य
१ किलो फ्लॉवर (बुडख्याचा भाग कापून. वरचा फ्लॉवर अख्खा ठेवायचा.), २ टेबलस्पून तेल, १ टेबलस्पून बटर, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, १ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, १ टीस्पून गरम मसाला, २५० मिली क्रीम, मीठ आणि मिरपूड
फ्लॉवर भाजताना (रोस्ट करताना) वापरण्यासाठी : आणखी ३ ते ४ टेबलस्पून बटर, १ टेबलस्पून कसुरी मेथी, अर्धा कप डाळिंबाचे दाणे
गाजरांच्या ‘साईड डिश’साठी : अर्धा किलो गाजरे (साले काढून उभे उभे जाडसर काप करून), परतण्यासाठी बटर
फ्रेंच फ्राइजसाठी : अर्धा किलो बटाटे (फ्रेंच फ्राइजच्या आकारात कापून), तेल, मीठ व तिखट
कृती
फ्लॉवर अख्खा बुडेल इतकं मोठं भांडं घ्या. त्यात पाऊण भाग पाणी भरा आणि २ टेबलस्पून मीठ घालून पाण्याला उकळी आणा. त्यात फ्लॉवर घाला व ४ मिनिटे फ्लॉवर उकळत्या पाण्यात शिजवा. नंतर तो बाहेर काढून बाजूला ठेवून द्या.
एका पातेल्यात २ टेबलस्पून तेल तापवा, त्यातच १ टेबलस्पून बटर घाला. तेलात आले-लसूण पेस्ट व हिरव्या मिरचीची पेस्ट घालून मिनिटभर परता. जळू देऊ नका. गरम मसाला पावडर घालून आच बंद करा. लगेच त्यात क्रीम घाला, चवीनुसार मीठ-मीरपूड घाला आणि एकत्र करा. मसाल्याचे हे मिश्रण वेगळे ठेवून द्या.
फ्लॉवर ‘रोस्ट’ करण्यासाठी एका कढईत ४ टेबलस्पून बटर घ्या. बटर वितळल्यावर आधी अर्धवट शिजवून ठेवलेला फ्लॉवर पांढरा भाग खालच्या बाजूस करून त्यात ठेवा. ५ ते ६ मिनिटे मध्यम ते मंद आचेवर भाजा. अधूनमधून हलक्या हाताने फ्लॉवर हलवा.
६ मिनिटे भाजल्यावर फ्लॉवर उलटा करा व अजून थोडा भाजल्यावर सर्व्हिंग प्लॅटरवर काढून घ्या. आधी करून ठेवलेले मसाला व क्रीमचे मिश्रण या गरम फ्लॉवरवर नीट पसरून लावा. वरून कसुरी मेथी आणि डाळिंबाचे दाणे पेरा. भारतीय पद्धतीचा ‘रोस्टेड’ फ्लॉवर तयार!
परतलेली गाजरे
एक लिटर पाण्यात १ टीस्पून मीठ घाला व पाण्याला उकळी आणा. गाजरांचे उभे चिरलेले तुकडे त्यात घाला व ३ मिनिटे शिजू द्या. जास्त शिजवायचे नाहीत. गाजरातील पाणी निथळून लगेच त्यात बर्फाचे थंड पाणी घालून ठेवा. एका पातेल्यात थोडे बटर गरम करा व त्यात लसूण पेस्ट घाला. त्यात गाजरांचे तुकडे घालून, चवीनुसार मीठ-मिरपूड घालून परता. २-३ मिनिटे परतल्यावर गाजरांची ‘साईड डिश’ तयार. ही गाजरे फ्लॉवरच्या बाजूने पसरून सर्व्ह करावीत.
फ्रेंच फ्राईजसाठी
मोठ्या भांड्यात पुरेसे पाणी घ्या. त्यात थोडे मीठ घालून त्याला उकळी आणा. बटाट्याचे उभे-उभे चिरलेले तुकडे या पाण्यात ५ मिनिटे शिजू द्या. नंतर पाणी निथळून बटाटे ५ मिनिटे बर्फाच्या पाण्यात ठेवा. नंतर पाणी काढून टाकून ते स्वच्छ व कोरड्या फडक्यावर पसरा व जरा कोरडे होऊ द्या. हे फ्रेंच फ्राइज खरपूस तळा आणि तळल्यावर त्यावर तिखट-मीठ भुरभुरा. हेसुद्धा सर्व्ह करताना रोस्टेड फ्लॉवरच्या बाजूला ठेवा.
पनीर खुरचन
साहित्य : अर्धा किलो पनीर, ३ मध्यम आकाराचे कांदे (जाडेभरडे चिरून), २ टोमॅटो (चिरून), ३ हिरव्या मिरच्या (चिरलेल्या), ४ टेबलस्पून तेल, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, १ टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ, तळलेला कांदा (वरून घालण्यासाठी)
कृती : तेल तापवून त्यात जाडभरडा चिरलेला कांदा गुलाबी होईपर्यंत परता. त्यात आले-लसूण पेस्ट घालून मिनिटभर परता. हिरवी मिरची, तिखट पावडर व हळद घाला. टोमॅटो घालून ते चांगले मऊ शिजवा. त्यात पनीरचे तुकडे करून घाला. चवीनुसार मीठ घालून ५ मिनिटे शिजवा. शेवटी गरम मसाला आणि लिंबाचा रस घालून आच बंद करा आणि नीट ढवळा. वरून खरपूस तळलेला कांदा पेरा. पनीर खुरचन तयार!
(अनुवाद : संपदा सोवनी)