- घनश्याम पाटील, editor@esakal.com
एखाद्या अद्भूतरम्य कादंबरीपेक्षाही थराराक, रोमांचकारी आणि प्रेरणादायी असे कुणाचे आत्मकथन असू शकते का? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी म्हणून एका पुस्तकाचे नाव सांगता येईल. ज्यांच्या घरातच देशप्रेम आणि शौर्याच्या संस्कारांची परंपरा आहे, अशा एअरमार्शल भूषण गोखले आणि मेघना गोखले यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे ‘आकाशझेप’. देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असताना आकाशझेप घेणाऱ्या एका साहसी सेनापतीची ही शौर्यगाथा आहे.
‘बिंगो’ या टोपणनावाने परिचित असलेल्या गोखले यांचे हे टोपणनाव बी. एन. गोखले यावरून पडले नाही तर या नावाला वैमानिक क्षेत्रात अनेक अर्थच्छटा आहेत. त्याविषयी त्यांनी या पुस्तकात लिहिले आहे. आपल्या झुंझार वडिलांच्या आठवणी जागवताना आचार्य अत्रे यांनी ‘नवयुग’च्या तीन अंकांत ‘सत्यसृष्टीतला झुंझार डिटेक्टिव्ह’ ही लेखमाला लिहिल्याचे ते गौरवाने सांगतात.
ग्लायडिंगच्या एका अनुभवानंतर खट्टू झाल्यावर फ्लाईट लेफ्टनंट मेनेझीस भूषणजींना म्हणतात, ‘बिंगो, मला माहीत आहे, भविष्यात तू खूप उंच उंच भरारी घेणार आहेस! पण एक लक्षात ठेव, जे वर जाते त्याला खाली यावेच लागते. म्हणूनच कितीही उंच उडालास तरी पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवलेले पाहिजेत...’
गोखले ही आठवण जागवून लिहितात, ‘त्यांचे बोलणे ऐकून माझी नाराजी कुठल्या कुठे पळून गेली. जीवनामध्ये उंचच उंच भरारी घेण्याचा निर्धार त्या वेळी कायम झाला आणि जीवनात अहंकाराला कधीही बळी न पडण्याचा देखील... आपण कितीही मोठे झालो, गगनाला गवसणी घातली तरी समाजाचे ऋण लक्षात ठेवायचे, शक्य तितकी समाजसेवा करायची, देशसेवा करायची हे तत्त्व मनाशी नक्की झाले.’ हाच मंत्र त्यांनी आजतागायत जपल्याचे त्यांच्या आजवरच्या वाटचालीवरून दिसून येते.
फ्लाईग ऑफिसर विजय राजन या आपल्या सहकारी मित्राच्या झालेल्या अपघाती मृत्यूचे वर्णन त्यांनी केले आहे. विमानातून इजेक्ट करताना पॅराशूट सोडतेवेळी उंचीचा, हवेचा अंदाज चुकल्याने पाण्यात न पडता ते नदीच्या काठावर पडले आणि अंतर्गत रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. असे प्रसंग वाचताना ही मंडळी त्यांच्या प्राणाची बाजी लावून देशसेवेसाठी जे बलिदान देतात त्याची जाणीव होते.
बांगलादेश युद्धातील ऐतिहासिक विजय, युद्धानंतर फ्लाईंग इन्स्ट्रक्टर स्कूल कोर्ससाठी झालेली निवड, तिथले प्रशिक्षण आणि अनुभव हे सारे मुळातच वाचण्यासारखे आहे. एफआयएसमध्ये पहिले आल्यानंतर ‘फ्लाईंगचे स्वप्न पाहणारा पहिला माणूस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग्रीक पुराणकथेतील ‘इकॅरस’ या कारागिराचा पुतळा असलेली ट्रॉफी त्यांना मिळाली.
त्यानंतर १९७३ मध्ये नव्यानेच सुरू झालेल्या हैदराबादजवळील दुंडिगल येथील एअर फोर्स अॅकॅडमीमध्ये त्यांची पोस्टिंग झाली. तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवतानाच्या अनुभवाविषयी ते लिहितात, ‘विद्यार्थ्यांना शिकवताना बारीकसारीक चुका कशा होऊ शकतात, हे समजावून सांगणे आणि ते सुद्धा स्वतःवर संयम ठेवून, शांतपणे सांगण्याचे आव्हान असते.
विद्यार्थ्याला सक्षम बनविण्याची प्रक्रिया करताना प्रशिक्षकाला जर विद्यार्थ्याकडून चूक होत असेल, तर कुठल्या क्षणाला स्वतःकडे विमानाचे नियंत्रण घ्यायचे, तो क्षण निवडणे ही तारेवरची कसरत असते.
विद्यार्थी त्या चुकीतून योग्य तो मार्ग काढून आणि प्रसंगावधान राखून जर परत अचूक फ्लाइंग करू शकला, तर तुम्ही दिलेले प्रशिक्षण योग्य ठरते आणि जर विद्यार्थ्याच्या प्रत्येक चुकीनंतर इन्स्ट्रक्टर स्वतःकडे नियंत्रण घेऊ लागला, तर विद्यार्थी एकटा कधीच फ्लाइंग करण्यास सक्षम होत नाही.’ हे निरीक्षण महत्त्वाचे तर आहेच पण अनेक क्षेत्रासाठी ते तंतोतंत लागू पडते.
जीवनात सत्याची कास धरणे किती महत्त्चाचे असते हे ‘मृत्यूचा निसटचा स्पर्श’ या प्रकरणात सांगताना गोखले लिहितात, ‘आयुष्यामध्ये कधीही खोटे बोलून, आपली जबाबदारी, चूक मान्य न करता दुसऱ्याच्या अंगावर ढकलून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. कारण एक ना एक दिवस हे सत्य बाहेर येतेच. खोटे बोलून तुम्ही तात्कालिक फायदा करून घेऊ शकाल मात्र त्याचा कायमस्वरूपी लाभ होऊ शकणार नाही.’
वैमानिकाची पत्नी होणे म्हणजे कोणत्या दिव्यातून जावे लागते हे मेघनाताईंनी अनेक उदाहरणाद्वारे लिहिले आहे, ‘जीवनात कोणतीही परिस्थिती आली, कितीही अडचणी आल्या तरी मी सदैव साथ देईन, बरोबर असेन.
पुढे जे काही होईल त्याला आपण मिळून तोंड देऊ’ असे धीरोदात्तपणे सांगत प्रत्येक अडचणीच्या काळात मेघनाताईंनी भूषण यांची खंबीर पाठराखण केली आहे. पती-पत्नीच्या नात्यातील हाच विश्वास, ही समर्थ साथ हेच तर आपल्या आदर्श भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. या पुस्तकातून ते वेळोवेळी अधोरेखित होते.
इराकमधील वास्तव्य, मुक्काम पोस्ट हिंडन आणि भटिंडा, वेलिंस्टन स्टाफ कॉलेज कोर्स, २२१ स्कॉड्रनचे नेतृत्व ही प्रकरणेही वाचनीय आहेत. अमेरिकेतील १९९१-९२ चे एअर वॉर, इजिप्तमधील तीन वर्षे, ऑपरेशन पराक्रम अशी प्रकरणे आपल्याला वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. वायुसेना उपप्रमुख ही तर प्रत्येकासाठी अभिमानास्पद बाब आहे.
या पुस्तकात हे सगळं वाचताना स्वाभाविकपणे आपल्या मनातही देशप्रेमाचे अनोखे स्फुलिंग चेतते. देशसेवा करतानाचे अनुभव, कौटुंबिक आठवणी आणि निवृत्तीनंतरचे आयुष्य अशा सगळ्या आघाड्यांवरील अनुभवकथन ओघवत्या आणि चित्रदर्शी शैलीत केल्याने या लढवय्या सेनानीचा इतिहास प्रभावी शैलीत शब्दबद्ध झाला आहे.
पुस्तकाचे नाव : आकाशझेप
लेखक : एअरमार्शल भूषण आणि मेघना गोखले
प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन, पुणे (०२० २५५३७९५८)
पृष्ठे : ३६० मूल्य : ६०० रुपये.