Sanjay Raut said we will forget the past
Marathi April 21, 2025 08:25 PM


मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. याबाबतची भूमिका अधिक स्पष्ट करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, आमच्या कोणत्याच नेत्याने उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेच्या विरोधात जाऊन मत मांडलेले नाही. आमच्या भावना स्वच्छ आहेत, त्यामुळे कोणी काहीही बोलू द्या भूतकाळात वळायचे नाही, असे आम्ही ठरवले आहे. (Thackeray brothers: Sanjay Raut said we will forget the past)

सोमवारी सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, देशाच्या आणि राज्याच्या हितासाठी जेव्हा हातमिळवणी करतो तेव्हा मागे वळून बघायचे नसते. एक पाऊल पुढे टाकत असताना मागे काय झाले होते, याकडे दुर्लक्ष करायचे, अशी आमची भूमिका आहे. त्यांनी मागे काय टीका केली होती, काय भूमिका मांडली होती, हे पुढे जाताना विसरायला पाहिजे. हाच सकारात्मक दृष्टीकोन आहे. आता नवीन प्रवाह सुरू होत आहे तो गढूळ करण्याचा प्रयत्न आम्ही कदापि करणार नाही.

जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करताना भूतकाळात बघायचे नाही, आमची भूमिका होती. त्याआधी आम्ही एकमेकांवर भरपूर टीका केली. पण जेव्हा एकत्र यायचे होते तेव्हा भूतकाळाकडे पाहिले नाही, फक्त भविष्याचा विचार केला, असे सांगून ते म्हणाले, 2014ला भाजपाने युती तोडली तेव्हाही आम्ही एकमेकांवर जोरदार टीका केली, पण नंतर आम्ही एकत्र आलो.

संदीप देशपांडेंवर निशाणा

राज ठाकरे परदेशात असून तिथे जाण्यापूर्वी, युतीचा विषय संवेदनशील असून याबाबत 29 एप्रिलपर्यंत कोणीही बोलू नका, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. याबाबत संजय राऊत म्हणाले, ‘राज ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील मत व्यक्त केले आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे इतरांनी त्यासंदर्भात बोलण्याची गरज नाही. नवीन प्रवाह निर्माण करण्याबाबत राज ठाकरे सकारात्मक आहेत. त्यांच्या मनात विचार पक्के असल्याशिवाय एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती. हे जर त्यांच्या अनुयायांना कळत नसेल तर, मी काय करणार?’ असे सांगत राज ठाकरे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर निशाणा साधला आहे.



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.