मुंबई : एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलताना भाजपा उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी 26/11 हल्यासंबंधी आरोप करताना तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर खळबळजनक आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले की, मुंबई शहरावर झालेल्या 26/11 रोजीच्या हल्ल्यात तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारचा हात होता. मुंबईवरील 26/11 चा हल्ला होणार असल्याची कल्पना सर्वांना होती. कारण स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीचा सहभाग असल्याशिवाय इतका मोठा हल्ला घडणे अशक्य आहे. माधव भंडारी यांच्या या आरोपावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अशातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तहव्वूर राणासोबत माधव भंडारीची चौकशी करावी आणि चौकशी होईपर्यंत अजित पवारांना मंत्रीमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी केली आहे. (Harshvardhan Sapkal demands that Madhav Bhandari be investigated along with Tahavvur Rana and till then Ajit Pawar be dismissed from the cabinet)
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुंबईवरील दहशतवादी 26/11 च्या हल्ल्या प्रकरणी भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. या प्रकरणातला आरोपी डेव्हिड कोलमन हेडली अद्याप फरार आहे. तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करून त्याला मुंबईत आणले आहे. त्यामुळे आता माधव भंडारींना ताब्यात घेऊन त्यांचीही राणासोबत चौकशी करावी. त्यांनी केलेले वक्तव्य गंभीर आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार त्यावेळी सरकारमध्ये असलेले अनेक नेते आज भाजपामध्ये आहेत. तसेच अजित पवारांसह अनेकजण त्यावेळीही मंत्रिमंडळात होते आणि आताही मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे अजित पवारांना मंत्रिपदावरून बरखास्त करून त्यांचीही चौकशी करावी. कायम राष्ट्रहिताच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाचे नेते किती खरे बोलतात, ते आता समोर येईल, अशी भूमिका सपकाळ यांनी मांडली.
हेही वाचा – Congress : जलजीवन योजनेतील भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्र तहानलेलाच; सपकाळ यांचा गंभीर आरोप
हिंदी सक्तीच्या निर्णयावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पहिलीपासून हिंदीची सक्ती करणे हे एक मोठे षडयंत्र आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती संपवण्यासाठीच हिंदी लादली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची मराठी भाषा संपवण्याचा हा डाव आहे. सरसंघचालक गोळवलकर यांच्या बंच ॲाफ थॅाट्स या पुस्तकात जे लिहिले त्याची अंमलबजावणी सरकारकडून सुरू आहे. हिंदीची सक्ती अगोदर गुजरातमध्ये करावी. पहिलीच्या वर्गापासून तीन भाषा सक्तीच्या करणे हे अशास्त्रीय आहे. त्याचा भार विद्यार्थ्यांना झेपेल का? सरकारने याचा काही विचार केलेला नाही. भाषा सल्लागार समितीने या निर्णयाला विरोध केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी घुमजाव केले आहे. त्यांना सक्ती करण्याची आवड आहे, पण त्यांनी हा निर्णय परत घ्यावा, ही आमची मागणी कायम असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – Ajit Pawar : बैठकीला काका-पुतणे अडीच तास एकमेकांच्या शेजारी; अजितदादा म्हणाले, परिवार म्हणून एकत्र येणं…