Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या घातल्या. या हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. भारताने 1960 सालच्या सिंधू जलवाटप कराराला स्थगिती दिलीय. तसेच पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आदेश दिलाय. यासह इतरही तीन महत्त्वाचे निर्णय भाताने घेतले आहेत. असे असतानाच आता भारताने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तान भारताने घेतलेल्या निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. पाकिस्तान भारतासाठी एअरस्पेस बंद करण्यासाठी शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताची अनेक विमाने ही पाकिस्तानच्या हद्दीतून प्रवास करत अन्य देशांत पोहोचतात. मात्र पाकिस्तानने हा निर्णय घेतल्यास भारताच्या एकाही विमानाला पाकिस्तानातील मार्गाने प्रवास करता येणार नाही. त्यामुळे भारताला अन्य मार्गांचा शोध घ्यावा लागेल. पाकिस्तानमध्ये त्यांच्या सुरक्षा समितीची बैठक चालू आहे. या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
पहलागमच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानची कायदेशीर कोंडी करण्याचं ठरवलंय. भारताच्या विदेश मंत्रालयाची 23 एप्रिल रोजी जवळपास तीन तास बैठक चालली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भारताने एकूण पाच निर्णय घेतले आहेत.
1) भारताने सिंधू जलवाटप करार सध्या स्थगित केला आहे.
2) तसेच अटारी सीमा बंद केली आहे.
3) SAARC Visa Exemption Scheme (SVES) या योजनेअंतर्गत पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानमधील ज्या नागरिकांकडे सध्या SVES व्हिसा आहे, त्यांनी 48 तासांच्या आत भारत सोडून जावे, असा आदेशही भारताने दिला आहे.
4) भारताने पाकिस्तानच्या सर्व लष्करविषयक सल्लागारांना भारतातून जाण्यास सांगितलं आहे. नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात असणाऱ्या नौदल, हवाईदल आणि लष्करी सल्लागारांना भारत सोडून जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांना पर्सोना नॉन ग्रॅटा घोषित करण्यात आलं असून भारत सोडण्यासाठी त्यांना एका आठवड्याचा वेळ देण्यात आला आहे. यासह इस्लामाबाद येथे असलेल्या भारतीय उच्चायुक्तालयातील भारतीय लष्करविषयक सल्लागारांनाही भारताने परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.
5) भारताने राजनैतिक अधिकारी कमी करण्याचाही निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत पाकिस्तानत असलेल्या भारतीय उच्चायुक्तालयांची संख्या कमी करण्यात येणार आहे. सध्या पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या ही 55 आहे. ती 1 मे 2025 पर्यंत 30 ने कमी करण्यात येईल. द्वीपक्षीय संवादांवर मर्यादा आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.