राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीची आयपीएल 2025 स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली. त्यानंतर दोन सामने जिंकले मात्र प्लेऑफच्या शर्यतीपासून खूपच दूर आहे. उलट एखाद दुसरा सामना गमावला तर प्लेऑफच्या शर्यतीतून संघ आऊट होईल. आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 6 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ससारखी स्थिती आहे. राजस्थान रॉयल्सच्या पराभवाचं विश्लेषणात संजू सॅमसनच्या दुखापतीचं कारण पुढे येत आहे. संजू सॅमसन दुखापतग्रस्त असल्याने तीन सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळला. आता त्याच्या दुखापतीबाबत हेड कोच राहुल द्रविडने अपडेट दिली आहे. राहुल द्रविडने सांगितलं की, संजू सॅमसन फिट नाही आणि वैद्यकीय टीमने त्याला खेळण्याची परवानगी दिलेली नाही. संजू सॅमसनने आतापर्यत मालिकेत सात सामने खेळले आहेत. यात त्याने 30 च्या सरासरीने आणि 140 च्या स्ट्राईक रेटने 224 धावा केल्या आहेत.
राहुल द्रविडने बंगळुरुत झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘मला वाटतं की दिल्ली विरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसनला थोडा त्रास झाला होता. मागील सामना किंवा या सामन्यात खेळू शकणार नाही. तो फीट नाही आणि आमच्या वैद्यकीय टीमने त्याला खेळण्याची परवानगी दिली नाही.’ सॅमसन डगआऊटमध्ये का येत नाही? या प्रश्नावर राहुल द्रविड म्हणाला की, ‘ पुढील प्रवासाचा धोका लक्षात घेता आम्ही वैद्यकीय सल्ला घेतला आहे. प्रवासामुळे त्याचा त्रास विनाकारण वाढू शकतो. आम्ही त्याच्यावर उपचार करण्यासाठी आणि त्याला बरं करण्यासाठी फिजिओ त्याच्यासोबत ठेवला आहे. आम्ही त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहोत.’
राजस्थान रायल्सचं स्पर्धेतील आव्हान अजून संपलेलं नाही. अजूनही राजस्थान रॉयल्सला 6 सामने खेळायचे आहे. सध्या राजस्थान रॉयल्सच्या पारड्यात 4 गुण आहे. उर्वरित सहा पैकी सहा सामन्यात विजय मिळवला तर 16 गुण होतील. आयपीएल स्पर्धेत 16 गुण मिळवणारा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरू शकतो. पण या सहा सामन्यासाठी संजू सॅमसन मैदानात परतेल की नाही याबाबत शंका आहे. राजस्थानचा पुढचा सामना आरसीबीविरुद्ध 28 एप्रिलला होणार आहे.