श्रीनगर - लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी त्यांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यादरम्यान जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची स्वतंत्रपणे भेट घेत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल चर्चा केली.
राहुल गांधी यांनी शुक्रवारी सकाळी येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पहलगाम हल्ल्यातील जखमींची भेट घेतली. यानंतर राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची स्वतंत्रपणे भेट घेत पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्या बद्दल चर्चा केली.
यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल म्हणाले की, या हल्ल्यानंतर सरकार जो काही निर्णय घेईल त्यात आम्ही सरकार बरोबर आहोत. हल्ल्यावेळी विशिष्ट समुदायाच्या नागरिकांना आणि निरपराध लोकांना लक्ष्य करणे यातून दहशतवाद्याच्या धोरणांनाच बळ मिळत आहे. काश्मीरमध्ये सामाजिक सौहार्द जपणे आवश्यक आहे. असे मतही राहुल यांनी व्यक्त केले.
काश्मिरींची पाठराखण
‘देशातील इतर भागांतील काही जण काश्मीरमधील नागरिकांवर टीका करत असल्याचे पाहून वेदना होत आहेत. आपण सर्वांनी ऐक्य साधून दहशतवादाचा सामना करणे आवश्यक आहे,’ असे राहुल गांधी म्हणाले. राहुल यांनी त्यांच्या काश्मीर दौऱ्यादरम्यान, काश्मीरमधील विविध समुदायांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि पर्यटन क्षेत्रात कम करणाऱ्या प्रतिनिधींशीही संवाद साधला.