गिरणी कामगारांना घरे देण्यास प्राधान्य
एकनाथ शिंदे यांची ग्वाही ; शिष्टमंडळाशी चर्चा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २६ : गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी ‘एनटीसी’ समवेत तातडीने बैठक घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे, अशी माहिती गिरणी कामगार संघटनेने प्रसिद्धी पत्रकार दिली आहे.
याशिवाय शेलू आणि वांगणी येथील घरांच्या किंमती कशा कमी करता येतील या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गिरणी कामगारांना दिल्याचे पत्रकात म्हटले आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे गिरणी कामगारांच्या घरांसंदर्भात शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांना भेटले. उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे कामगारांनी स्वागत केले. बैठकीस राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी मंत्री रामदास कदम, आमदार कालिदास कोळंबकर, माजी खासदार राहुल शेवाळे, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह गिरणी कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गिरणी कामगारांना मुंबईत घर मिळावे, ही शासनाची प्रामाणिक भावना आहे. त्यासाठी मुंबईत किती जागा उपलब्ध होऊ शकते, यासाठी एनटीसीसोबत बैठक घेण्यात येणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देत आहोत. मुंबई महानगर प्रदेशातदेखील घरे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आतापर्यंत १५ हजार ८७० घरे गिरणी कामगारांना दिली. आजपर्यंत सुमारे एक लाख गिरणी कामगार पात्र असून, त्यांना घरे उपलब्ध करून देण्यात येतील.