समुद्रकिनाऱ्यावर परभाषिक छायाचित्रकारांचे अतिक्रमण
श्रीवर्धन, ता. २८ (वार्ताहर) ः श्रीवर्धन येथील समुद्रकिनाऱ्यावर परभाषिक छायाचित्रकारांचे अतिक्रमण वाढल्याने स्थानिकांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे. येथील समुद्रकिनाऱ्यालगत स्थानिक बेरोजगार तरुणांनी भेळपुरी, चहाची टपरी, विविध साहित्य विक्रीची दुकाने, छायाचित्र असे विविध व्यवसाय थाटले आहेत. यामध्ये मागील काही महिन्यांपासून परभाषिक तरुणांनी अद्ययावत असे कॅमेऱ्याच्या माध्यमातून छायाचित्रणाचा व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे, अलिबागमधील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर अशा प्रकारचे परप्रांतीय छायाचित्रकारांची संख्या वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर गदा येत असल्याने रोष व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय, या परप्रांतियांकडून समुद्रकिनाऱ्यावर अनधिकृत बांधकामदेखील करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राम प्रशासनाकडून यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.