मुंबई इंडियन्सने गुरुवार 1 मे रोजी राजस्थान रॉयल्सवर 100 धावांनी दणदणीत विजय मिळवला. मुंबईने राजस्थानला जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये पराभवाची धुळ चारली. मंबईने यासह सलग सहावा आणि एकूण सातवा विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं. मुंबईने राजस्थानला विजयासाठी 217 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र राजस्थानचं 117 धावांवरच पॅकअप झालं. मुंबईसाठी त्याआधी रायन रिकेल्टन आणि रोहित शर्मा या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर त्यानंतर हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी प्रत्येकी नाबाद 48 धावा केल्या. सूर्यकुमार यादव याने यासह मोठा कारनामा केला आणि आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याचा हिशोब बरोबर केला.
सूर्यकुमारने राजस्थान विरुद्ध 23 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 फोरसह 208.70 च्या स्ट्राईक रेटने 48 रन्स केल्या आणि ऑरेंज कॅप मिळवली. सूर्याने यासह विराटचा हिशोब बरोबर केला. विराटने रविवारी 27 एप्रिलला दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 51 धावा करत सूर्याकडे असलेली ऑरेँज कॅप काही तासांतच हिसकावली होती. त्यामुळे सूर्याच्या आनंदावर विरजण पडलं. सूर्याने त्याची आता अचूक परतफेड केली आहे.
रविवारी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं होतं. सूर्याने त्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 28 बॉलमध्ये 45 रन्स केल्या. सूर्याने यासह आयपीएल इतिहासात पहिल्यांदा ऑरेँज कॅप मिळवली. सूर्याच्या खात्यात एकूण 427 धावा झाल्या होत्या. मात्र त्यानंतर डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्यात विराटने दिल्ली विरुद्ध 47 चेंडूत 51 धावा केल्या. विराटने अशाप्रकारे सूर्याला मागे टाकलं. विराटच्या खात्यात 443 धावा झाल्या. त्यामुळे सूर्याला राजस्थान विरूद्धच्या सामन्याआधी विराटला मागे टाकण्यासाठी 17 धावांची गरज होती. सूर्याने राजस्थान विरुद्ध 18 वी धाव पूर्ण केली आणि या हंगामात दुसऱ्यांदा ऑरेंज कॅप मिळवली आणि विराटचा हिशोब बरोबर केला.
सूर्यकुमार यादव ऑरेंज कॅपचा मानकरी
ताज्या आकडेवारीनुसार,सूर्यकुमार यादव 11 सामन्यांमधील 11 डावात सर्वाधिक 475 धावा करुन पहिल्या स्थानी विराजमान आहे. दुसऱ्या स्थानी गुजरात टायटन्सचा ओपन साई सुदर्शन याने 9 डावांमध्ये 456 रन्स केल्या आहेत. आरसीबीच्या विराटची 10 डावांमध्ये केलेल्या 443 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. राजस्थान रॉयल्सचा यशस्वी जयस्वाल याने 11 सामन्यांमध्ये 439 धावा केल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर गुजरातचा जोस बटलर विराजमान आहे. बटलरने 9 डावांत 406 धावा केल्या आहेत.