>> उदय पिंगल
बनावट नोटांवर सातत्याने कारवाई होत असल्याच्या बातम्या येत असतात. गुप्तचर यंत्रणेच्या अंदाजानुसार अर्थव्यवस्थेत चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी 3 टक्के म्हणजेच 35000 कोटी रुपयांच्या नोटा बनावट आहेत. मात्र हे नेमके कसे घडत असावे आणि याचे परिणाम काय याबाबत आपण अनभिज्ञ असतो. हातातील नोट खरी आहे की खोटी हे ओळखू न येण्याइतपत त्याची नक्कल करण्यात येते. तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की कोणत्याही सुरक्षित चलनाची नक्कल करता येणे शक्य आहे. देशातील अर्थव्यवस्था कोलमडावी अशी देशविघातक वृत्तीच्या लोकांची, आपल्या शत्रूराष्ट्रांची अपेक्षा असल्याने बनावट नोटा निर्माण करून ते अर्थव्यवस्थेत आणत असतात. 2016 मध्ये नोटाबंदी करण्यामागे बनावट नोटांमुळे निर्माण होत असलेल्या आव्हानांना तोंड देणे हा महत्त्वाचा उद्देश होता. मात्र गेल्या काही वर्षांत पुन्हा चलनामध्ये बनावट नोटांचा अंतर्भाव असण्याचे प्रमाण वाढले आहे. जगभरात सर्वच देशांना कमी अधिक प्रमाणात या समस्येशी सामना करावा लागत आहे. यामागचा उद्देश, त्याचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम आणि याबाबतचे उपाय याचा उहापोह करणारा हा लेख.
विनिमयाचे सर्वात सोपे साधन म्हणजे चलन. सरकारच्या वचनाने त्यास सार्वत्रिक मान्यता मिळते. कायद्याचा पाठिंबा आणि जनतेचा विश्वास या आधारावरच चलनाचा वापर होतो. आपला अर्थसंकल्प तुटीचा असल्याने त्याची भरपाई करण्यासाठी सरकार कर्ज घेते त्यावर व्याज द्यावे लागत असल्याने सरकारची जबाबदारी वाढते. काही प्रमाणात चलन निर्माण करावे लागते त्यामुळे महागाई वाढते, परंतु अर्थव्यवस्था गतिमान होते. हे सर्व एका मर्यादेत होणे अपेक्षित असून त्याचे व्यवस्थापन भारतीय रिझर्व्ह बँक करते. रिझर्व्ह बँक ही उत्तम व्यवस्थापक असून ती नवीन चलनाची निर्मिती करणे, वाटप करणे, नियंत्रण राखणे, खराब झालेल्या नोटा अर्थव्यवस्थेतून काढून घेणे यासारखी अनेक कामे लोकांचा चलनावरील विश्वास वाढावा यासाठी करीत असते.
अर्थव्यवस्थेत मोठय़ा प्रमाणात चलन आल्यास त्याचे मूल्य कमी झाल्याने महागाई वाढते. त्यामुळे समाजात असंतोष पसरतो. प्रसंगी समाज बंडखोरी करू शकतो. असे काहीतरी घडून अर्थव्यवस्था कोलमडावी अशी देशविघातक वृत्तीच्या लोकांची, आपल्या शत्रूराष्ट्रांची अपेक्षा असल्याने बनावट नोटा निर्माण करून ते अर्थव्यवस्थेत आणत असतात. यापूर्वी सन 2016 मध्ये नोटाबंदी करण्यामागे बनावट नोटांमुळे निर्माण होत असलेल्या आव्हानांना तोंड देणे हाही एक उद्देश होता. यानंतर आणलेल्या नोटा अधिक सुरक्षित असतील असे सांगण्यात आले होते. रिझर्व्ह बँकेच्या अलीकडच्या अहवालानुसार चलनात असलेल्या बनावट नोटांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गुप्तचर यंत्रणेच्या अंदाजानुसार अर्थव्यवस्थेत चलनात असलेल्या एकूण नोटांपैकी 3 टक्के म्हणजेच 35000 कोटी रुपयांच्या नोटा बनावट आहेत. तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की कोणत्याही सुरक्षित चलनाची नक्कल करता येणे शक्य आहे. चलन छापण्यासाठी जो खास कागद वापरला जातो तो जगभरातील 11 कंपन्यांकडून आयात केला जातो. त्यातील 10 युरोपात आणि एक अमेरिकेत आहे. यासाठी लागणारी विशेष शाई निर्माण करणारी कंपनी स्वित्झर्लंडमध्ये आहे. सुरक्षा एजन्सीजना असा संशय आहे की, या कंपन्यांतील काही कर्मचाऱ्यांशी संगनमत साधून कागद आणि शाई मिळवली जात असावी, परंतु ते अजूनही सिद्ध करता आलेले नाही. जगभरात सर्वच देशांना कमी अधिक प्रमाणात या समस्येशी सामना करावा लागत आहे.
बनावट नोटांचे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम
महागाईत वाढ : चलनात अतिरिक्त पैसा आल्याने त्याचा पुरवठा वाढतो. ज्यामुळे वस्तूचे प्रत्यक्ष मूल्य आणि अनुमानीत मूल्य यांच्यात असमतोल निर्माण होतो. या अतिरिक्त पैशामुळे किमती वाढू शकतात. महागाईत वाढ होते त्यामुळे लोकांची क्रयशक्ती म्हणजे खरेदी करण्याची क्षमता कमी होते. त्याने अर्थव्यवस्था अस्थिर होते.
विश्वासास तडा : चलनाचे मूल्य घटल्याने महागाईत वाढ होते. त्यामुळे जनतेचा सरकारवरील विश्वास कमी होतो. त्याचबरोबर नियामक आणि चलनावरील विश्वास कमी होतो. लोक चलनास अन्य सुरक्षित पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतात.
व्यवसायाची हानी : बनावट नोटा उद्योगात आल्या तर त्यांचा थेट फटका छोटय़ा उद्योगांना अधिक बसतो. त्यांचे सर्वाधिक आर्थिक नुकसान होते. त्यांची तेवढे नुकसान करून घेण्याची आर्थिक ताकद नसते.
बँकिंग व्यवसायाची हानी : अशा नोटा काही कारणाने बँकेत आल्या तर बँकांचे नुकसान होते. त्यांना आपली सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी लागते. त्यासाठीच्या खर्चात वाढ होते.
यासोबतच बेकायदेशीर कृत्यांत वाढ होण्यासाठी हा मार्ग सर्रास वापरला जातो. हा पैसा देशविघातक कारवायांसाठी वापरला जात असल्याने बेकायदेशीर कृत्यांत वाढ होते. अशा व्यवहारांमुळे परकीय गुंतवणुकीत घट होऊ शकते. आर्थिक असुरक्षितता निर्माण झाल्याने देशातील परकीय गुंतवणुकीचा ओघ कमी होतो.
बनावट नोटांवर सातत्याने कारवाई होत असल्याच्या बातम्या आपण वृत्तपत्रांतून वाचत असतो. हा अतिशय गंभीर प्रश्न असून उपाय केले गेले पाहिजेत. यासाठी पुढील मार्गांचा अवलंब करणे इष्ट ठरते.
नोटांमध्ये अधिक सुरक्षा उपाययोजना करणे : बनावट नोटा छापल्या जाऊ नयेत म्हणून त्यात वॉटरमार्क, होलोग्राम यासारखे अधिकचे सुरक्षा उपाय योजणे. वारंवार डिझाइन बदलून पूर्वी छापलेल्या नोटा चलनातून काढून घेता येतात.
जनजागृती करणे : जनतेत खोटय़ा नोटा कशा ओळखाव्यात याबद्दल जनजागृती करणे. खऱया आणि खोटय़ा नोटांतील सूक्ष्म फरक समजावून सांगणे.
नोटाविरहित व्यवहारास प्रोत्साहन देणे : आता नोटा न वापरता सर्व व्यवहार करता येतात. अनेकजण असे व्यवहार करीत आहेत. त्यातही धोके आहेत, पण योग्य काळजी घेऊन ते सुरक्षितरीत्या करता येतात.
कडक शिक्षा करणे : खोटय़ा नोटा व्यवहारात आणणाऱया व्यक्तींना कडक शासन करणे. यासंबंधीचे खटले फास्ट ट्रक कोर्टाद्वारे चालवणे.
आधुनिक तंत्रज्ञान वापरणे : बँका, दुकाने, एटीएम सेंटर येथे खोटय़ा नोटा सहज ओळखता येतील अशा मशिन्सची सोय करणे.
इतर देशांची मदत घेणे : खोटय़ा नोटांच्या छपाईचा पर्दाफाश करण्यासाठी इतर देशांच्या गुप्तचर यंत्रणांची मदत घेणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्यांचा बीमोड करणे.
नोटाबंदी आणणे : हा अगदी शेवटचा उपाय असे म्हणता येईल. यामुळे अस्तित्वात असलेले सर्व चलन बाद होऊन नवीन चलनाची निर्मिती करता येईल.
सर्वच बँकांना बनावट नोटा व्यवहारातून काढून घेण्याच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेच्या स्पष्ट सूचना आहेत. तरीही एटीएममधून पैसे काढताना चुकून बनावट नोटा मिळाल्यास बँकेला ताबडतोब कळवावे. मशीनजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयास सदर नोट दाखवून व्यवहार पावतीसंदर्भासाठी ठेवावी, बँक तुम्हाला सदर नोट बदलून देईल. बनावट नोटा छापणे आणि त्या व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर गुन्हा आहे. जगभरात अनेक देशांकडून आता नोटा छापण्याचे प्रमाण कमी करण्यात येत असून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. मोबाइल बँकिंग, ग्राहकस्नेही आणि अधिक सुरक्षित करण्यावर भर देऊन त्याचा प्रसार, प्रचार करणे त्याचबरोबर त्यास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.
(लेखक अर्थ अभ्यासक आहेत.)