कोल्हापूर : कर्नाटकातील आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास राज्य सरकारचा तीव्र विरोध आहे. तरीही उंची वाढविण्यासाठी कर्नाटक सरकार वकील आणि जलतज्ज्ञांची फौज उभी करत असेल तर आम्हीही तशी फौज उभी करू. उंची वाढविण्याविरोधात कायदेशीरदृष्ट्या जे जे करावे लागेल, ते आम्ही करू,’’ असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शनिवारी येथे सांगितले.
ते म्हणाले, ‘‘महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये केलेल्या बदलांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेतील आर्थिक मदतीमध्ये वाढ केली जाणार आहे. योजनेत एकही रुपया रुग्णाकडून घ्यायचा नाही; मात्र काही रुग्णालय पैसे घेत असल्याचे समोर आले. तशा तक्रारी आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालयांविरोधात आरोग्य विभागाकडे आता ऑनलाइन तक्रार करता येईल.’’
‘‘लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीबाबत कसरत करावी लागत आहे. या अर्थसंकल्पामध्ये इतर विभागांना ज्या पद्धतीने निधी उपलब्धता व्हायला हवा होता तो झाला नाही. पण आता गाडी रुळावर येईल. लाडकी बहीणच नाही तर ज्या ज्या योजना दिल्या आहेत, त्यासाठीच्या निधीची उपलब्धता पुढच्या टप्प्यात होईल,’’ असे आबिटकर म्हणाले.