Cricket : कसोटी, वनडे आणि टी 20I मालिकेचं वेळापत्रक जाहीर, पहिला सामना केव्हा?
GH News May 06, 2025 03:05 AM

आयपीएलच्या 18 व्या मोसमात प्लेऑफसाठी चुरस पाहायला मिळतेय. तर दुसऱ्या बाजूला क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शेजारी श्रीलंकेने बांगलादेश विरूद्धच्या होम सीरिजचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. श्रीलंका घरात बांगलादेश विरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. बांगलादेश या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. बांगलादेशच्या श्रीलंका दौऱ्याची सुरुवात ही 17 जूनपासून होणार आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे.

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात एकूण 3 मालिकांमध्ये 8 सामने खेळवण्यात येणार आहेत. कसोटी मालिकेत 2 सामने होणार आहेत. तर त्यानंतर एकदिवसीय आणि टी 20i मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने होणार आहेत. बांगलादेशच्या या दौऱ्याची सुरुवात ही कसोटी मालिकेने होणार आहे. उभयसंघातील पहिला सामना 17 जूनपासून गॉल येथे होणार आहे. तर दुसरा आणि अंतिम सामना हा कोलंबोमधील सिंहली स्पोर्ट्स कल्ब येथे 25 जूनपासून खेळवण्यात येणार आहे.

वनडे सीरिज

उभयसंघातील कसोटी मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेचं आयोजन हे 2 ते 8 जुलै दरम्यान करण्यात आलं आहे. पहिले दोन्ही सामने हे अनुक्रमे 2 आणि 5 जुलैला कोलंबोत खेळवण्यात येणार आहेत. तर तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना हा 8 जुलैला होईल.

टी 20I मालिका

दरम्यान श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 2OI सीरिजला 10 जुलैपासून सुरुवात होईल. दुसरा सामना 13 जुलैला दांबुला येथे आयोजित करण्यात आला आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडेल. वनडे सीरिज डे-नाईट असणार आहेत. तर टी 20I मालिकेतील सामन्यांना संध्याकाळी सुरुवात होईल.

बांगलादेशच्या श्रीलंका दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

2021 नंतर श्रीलंका दौरा

दरम्यान बांगलादेशने याआधी 2021 साली कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौरा केला होता. तेव्हा उभयसंघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात आली होती. तेव्हा बांगलादेशला एका सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं. तर एक सामना ड्रॉ राहिला होता. बांगलादेशने श्रीलंकेत अखेरीस 2019 साली एकदिवसीय मालिका खेळली होती. बांगलादेशला तिन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं होतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.