बीड : बारावीची परीक्षा तोंडावर होती. बोर्डाची परिक्षा अवघ्या दीड महिन्यांवर आहे आणि वडिलांची जिल्ह्यातील गुंडांनीच अतिशय निर्घृणपणे हत्या केली. बाप त्याची जबाबदारी चोखपणे पार पाडत असताना काही समाजकंटकांनी त्याला अतिशय क्रूरपणे संपवलं. बापाला हालहाल करुन त्याची निर्घृणपणे हत्या केली जाते. एवढं भयानक दु:ख मस्साजोगमधील इयत्ता बारावीचं शिक्षण घेणाऱ्या वैभवी देशमुख हिच्यावर कोसळलं होतं. वैभवीला या परिस्थितीला कसं सामोरं जावं हे देखील कळत नसावं. पण वैभवीने मोठ्या हिमतीने परिस्थितीला सामोरं जाण्याचं ठरवलं.
आपल्या वडिलांची (संतोष देशमुख) हत्या करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हावी आणि आपल्या वडिलांना न्याय मिळावा या मागणीसाठी वैभवी अतिशय संयमाने परिस्थितीला सामोरं गेली. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण मस्साजोग गावच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वैभवीच्या बाजूने उभा राहिला. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी मूकमोर्चे निघाले. या मूकमोर्चांचं नेतृत्व वैभवी आणि तिचे काका धनंजय देशमुख यांनी केलं. ही वेळ वैभवीसाठी किती कठीण होती ते शब्दांमध्ये सांगणं कदापि शक्य नाही. वैभवी प्रत्येक क्षणाला आपल्या पित्याच्या आठवणीने व्याकूळ होत होती. नियतीने आपल्यासोबतच असं का घडवून आणलं? असा विचार करत होती.
पण वैभवीला अनेकांनी मानसिकपणे साथ दिली. अख्खा महाराष्ट्र तिच्याबाजूने उभा होता. त्याचदरम्यान, आई आणि लहान भावाची जबाबदारी आपल्यावर असल्यामुळे वैभवीने देखील धैर्यानं परिस्थितीला सामोरं जाण्याचं ठरवलं. तिने मूकमोर्चावेळी केलेलं भाषण हे आजही आठवलं की काळजात धस्स होतं. तेव्हापासून वैभवी लढत राहिली. पित्याला न्याय मिळावा यासाठी संघर्ष करत राहिली.
वडील गेल्याचं दु:ख असताना वैभवीने प्रचंड अभ्यास केला. या परीक्षेत अखेर वैभवी तब्बल ८५.१३ टक्के गुणांनी पास झाली. विशेष म्हणजे बायोलॉजी या विषयात वैभवीला १०० पैकी ९८ गुण मिळाले आहेत. तर मॅथेमॅटिक्समध्ये ९४, केमिस्ट्रीत ९१, फिजिक्समध्ये ८३, इंग्रजीमध्ये ६३ गुण, मराठीत ८३ असे ६०० पैकी ५१२ गुण मिळाले आहेत.