Ambadas Danve : पुरंदर विमानतळाची एकही वीट लागणार नाही; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आश्वासन
esakal May 06, 2025 03:45 AM

सासवड/खळद/पारगाव मेमाणे - विमानतळाची एकही वीट लागणार नाही, असे सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ प्रकल्पग्रस्तांना आश्वासन दिले.

कुंभारवळण (ता. पुरंदर) येथे शनिवारी ड्रोन सर्वेक्षणाच्या धसक्याने अंजनाबाई कामठे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिस व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांच्यात संघर्ष झाला. या पार्श्वभूमीवर रविवारी कुंभारवळण येथे दानवे यांनी कामठे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यानंतर त्यांनी सात गावांतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

यावेळी आमदार सचिन आहेर, उपनेत्या सुषमा अंधारे, उल्हास शेवाळे, अभिजित जगताप यांसह विमानतळ संघर्ष समितीचे सदस्य, शेतकरी, महिला उपस्थित होत्या. यावेळी दानवे म्हणाले, ‘वर्षानुवर्षे कसलेली जमीन एका रात्रीत शासन घेत असेल तर कोणतीही आई जगणार नाही हे पोलिसांनी लक्षात ठेवावे. आईला जमिनीची चिंता होती. त्यांच्या जाण्याला सरकार जबाबदार असल्याचे स्पष्ट सांगत आता यापुढे आपण रस्त्यावरची नाही तर कायदेशीर मार्गाने लढाई लढू.’

मग लाठीहल्ला कशासाठी - अंधारे

यावेळी सुषमा अंधारे यांनी सांगितले की, आम्ही येथे येण्यापूर्वी उपविभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विमानतळ होण्यासाठी ७० टक्के शेतकऱ्यांच्या सह्या असल्याचे त्यांनी सांगितले, मात्र येथे आल्यानंतर संपूर्ण चित्र वेगळे दिसले. सात टक्केही शेतकऱ्यांची संमती नाही. आम्ही पोलिस बंदोबस्त हा मोजणी अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी दिला होता असे सांगितले पण शेतकऱ्यांकडून एकाही मोजणी अधिकाऱ्याला दुखापत झाली नाही. मग लाठीहल्ला कशासाठी करण्यात आला.

पुरंदरला विमानतळाची गरज नाही. इथून पुण्याचे विमानतळ ३६ किलोमीटर अंतरावर आहे. आमची इच्छा नसताना आमच्यावर ते लादू नका. ज्यांना गद्दारी करायला वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते आणि अमित शहा, नरेंद्र मोदींना गुपचूप भेटावे लागते त्यांना विमानतळाची गरज वाटते. त्यामुळे त्यांनी बारामतीला विमानतळ करावे. बारामतीमधील विमानतळाचे विस्तारीकरण करावे.

- अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते विधान परिषद

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.