फ्लेमिंगो सफारीकडे ठाणे, मुंबईकरांची पाठ
राजीव डाके ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. ५ : शालेय सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाल्याने पर्यटनस्थळे फुलू लागली आहेत. राज्यातील प्रमुख ठिकाणांसह देश- विदेशात पर्यटनप्रेमींचे भ्रमण सुरू झाले आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून लोक आवडीचे ठिकाणे गाठत आहेत; मात्र हजारो किलोमीटरचा प्रवास करून ठाणे- मुंबईकरांच्या भेटीसाठी ठाणे, ऐरोली आणि भांडुप खाडीत आलेल्या परदेशी गुलाबी फ्लेमिंगोच्या भेटीला पर्यटक जाण्यास उदासीन दिसत आहेत. पक्षिप्रेमींना खाडीत येणाऱ्या फ्लेमिंगोंसह इतर पक्ष्यांचे निरीक्षण करता यावे, यासाठी जर्मनी देशाच्या मदतीने ऐरोली खाडी परिसरात फ्लेमिंगो सेंच्युरी उभी केली आहे.
ठाणे, मुंबईच्या खाडीकिनाऱ्याला लाभलेल्या खारफुटीच्या झाडांनी घनदाट जंगल तयार केले आहे. या शहरांना त्सुनामीसारख्या संकटापासून वाचवू शकेल, अशी खारफुटीची भक्कम भिंत निसर्गाने येथे उभी केली आहे. खारफुटीच्या घनदाट जंगलात विविध प्रकारचे पक्षी, प्राणी, वनस्पतींनी भरलेले हे जंगल पर्यटकांना आकर्षित करीत आहे. परदेशातून ठाणे, मुंबईकरांच्या भेटीला येणाऱ्या फ्लेमिंगोंमुळे हा भाग जगाच्या पर्यटन नकाशावर आला आहे; मात्र असे असतानाही ठाणे, मुंबई, नवी मुंबईकरच या स्थळाला भेटी देण्यास उदासीन दिसत आहेत.
सुट्टीचे दिवस असूनही रोज सरासरी २० ते २५ पर्यटकच फ्लेमिंगोंच्या भेटीला येतात. त्यात निम्मे पक्षिनिरीक्षक असतात. शालेय मुलांची येथे गर्दी होणे अपेक्षित असताना या वर्गाला येथे घेऊन येण्यास पालक उदासीन दिसतात. या खाडीत सुमारे १५-२० किलोमीटरची बोट सफारी करून खाडीत आलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन घडवले जाते. खाडीकिनाऱ्यावर पसरलेले शेवाळ खाताना हजारोंच्या संख्येने खाली माना घालून उभे राहिलेले हे पक्षी पाहताना जणू किनाऱ्यावर पांढऱ्या, गुलाबी रंगाची भलीमोठी चादर अंथरल्याचा भास होतो. तर खाडीच्या पाण्यात थवे करून बसलेले फ्लेमिंगो पाहून जणू गुलाबी शहरातून आपण जात आहोत, असे वाटते.
पाण्यावर पाहत असलेल्या फ्लेमिंगोंना संकटाची चाहूल लागताच हे पक्षी आकाशात झेप घेण्यासाठी पाण्यावर काही अंतर प्रचंड वेगाने धावतात. त्यानंतर आकाशात झेप घेतात. एकाच वेळी शेकडो फ्लेमिंगो पाण्यावर धावतात ते दृश्य फारच सुंदर दिसते. परदेशी फ्लेमिंगोसोबतच येथे येणाऱ्या पक्ष्यांमध्ये दक्षिणी ग्रे श्रीके, ब्लॅक ड्रॅंगो, भारतीय गोल्डन ओरिओल, ब्राह्मणी स्टार्लिंग, एशियाई पाइड स्टार्लिंग, पांढरा फँटल, ग्रीन व्हार्बलर, ग्रे हेरोन, तलाव बगळा, काळ्या पंखाचा स्टिल्ट, काळ्या शेपटीचा गॉडविट, किंगफिशर, यूरेशियन मार्श हॅरियर, ब्राह्मणी घार, ग्रीन सॅन्ड पायपर आणि इतर ६० हून अधिक प्रजातीचे पक्षी येथे येतात.
सागरी वनस्पती, प्राण्यांची माहिती
पर्यटकांची संख्या खूपच कमी असल्याने रोज अवघ्या एक-दोन वेळाच खाडीत बोट सफारी होते. रविवारी (ता. ४) बोटीच्या फेऱ्यांमध्ये काहीशी वाढ होते. त्यात ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईसारख्या शहरातून आलेले पर्यटक खूपच कमी असतात. छोटेखानी प्रदर्शनात फ्लेमिंगो, कासव, किंग फिशर, व्हेल, शार्क मासा यांची माहिती आणि त्यांचा आवाज येथे ऐकावयास मिळतो. सागरी वनस्पती, प्राणी, पक्षी यांची माहिती येथे मिळते.
सुविधांचा अभाव
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी ऐरोली येथील फ्लेमिंगी सेंच्यूरीला भेट देत या जागेचे कौतुक केले होते. काही तास घालवून स्वतः पक्ष्यांचे निरीक्षण करून फोटोग्राफी केली होती; मात्र तरीही राज्य सरकारकडून येथे विशेष सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत.
मुलीला सोबत घेऊन पक्षी निरीक्षणासाठी गेलो होतो. पक्षी पाहण्याचा खूप सुखद अनुभव होता. ठाणे, मुंबईजवळ एवढी मोकळी आणि पाणथळ जागी फ्लेमिंगो आणि इतर पक्ष्यांचे वावरणे पाहून खूप कुतूहल वाटले. सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे सोनेरी कोल्हा येथे पाहायला मिळाला. शासनाकडून आणखी चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
- भरत मोरे, पर्यटक, ठाणे