मुंबई : भारतीय शेअर बाजारात आज ५ मे रोजी मोठी तेजी दिसून आली. सेन्सेक्स २९५ अंकांनी वाढला. या वर्षी निफ्टी २४,४६१ या सर्वोच्च पातळीवर बंद झाला. परदेशी गुंतवणूकदारांकडून सतत खरेदी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे बाजारातील भावना सकारात्मक राहिल्या. यामुळे आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४.७८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. आज शेअर बाजारात झालेली वाढ चौफेर होती. बीएसई मिडकॅप निर्देशांक १.४५ टक्क्यांनी वधारला. तर स्मॉलकॅप निर्देशांक १.२३ टक्क्यांनी वाढला. बँकिंग वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकही वधारले. ऑटो आणि तेल आणि वायू शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स २९४.८५ अंकांनी वधारून ८०,७९६.८४ वर बंद झाला. तर निफ्टी ११४.४५ अंकांनी वाढून २४,४६१.१५ वर बंद झाला.बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ५ मे रोजी ४२७.५९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील व्यवहार दिवशी म्हणजेच शुक्रवार, २ मे रोजी ४२२.८१ लाख कोटी रुपये होते. सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४.७८ लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४.७८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. सेन्सेक्समधील ३० पैकी २० शेअर्स वाढीसह बंद झाले. यामध्ये, अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये सर्वाधिक ६.२९ टक्के वाढ झाली. तर बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम), इटरनल आणि आयटीसीचे शेअर्स १.८७ टक्के ते ३.७३ टक्क्यांपर्यंत वाढीसह बंद झाले.तर सेन्सेक्समधील उर्वरित १० शेअर्स घसरणीसह बंद झाले. यामध्येही कोटक महिंद्रा बँकेचा शेअर्स सर्वाधिक ४.५७ टक्क्यांनी घसरला. दुसरीकडे, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), अॅक्सिस बँक, टायटन आणि इंडसइंड बँक यांचे शेअर्स ०.५% ते १.२६% दरम्यान घसरले.