-rat५p३.jpg -
२५N६१८००
दक्षिण आफ्रिका ः गोलमेज परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व करणारी दक्षता लिंगायत. सोबत मान्यवर
----
देवरूखच्या कन्येचा दक्षिण आफ्रिकेत दबदबा
दक्षता लिंगायत; गोलमेज परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ५ ः देवरूखची सुकन्या दक्षता लिंगायत हिने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या प्रतिष्ठित गोलमेज परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व करून देशासाठी मानाचा तुरा रोवला आहे. जागतिक स्तरावर आर्थिक सहकार्य वृद्धिंगत करणे, आर्थिक स्थिरता जपणे आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे यासोबतच विकसनशील राष्ट्रांच्या समस्या आणि गरजांवर प्रभावीपणे प्रकाश टाकणे या महत्त्वपूर्ण उद्देशांनी ही गोलमेज परिषद आयोजित करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरील जटिल समस्यांवर एकत्रितपणे मंथन करणे हा या परिषदेचा केंद्रबिंदू होता.
जागतिक अर्थव्यवस्थेतील सर्वात मोठ्या २० राष्ट्रांचा समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ''जी-२०'' ची स्थापना झाली. हा समूह आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार, आरोग्य, हवामान बदल आणि इतर कळीच्या मुद्द्यांवर धोरणात्मक समन्वय साधण्यासाठी नियमित बैठकांचे आयोजन करतो. याच महत्त्वपूर्ण मालिकेंतर्गत दक्षिण आफ्रिकेत अलीकडेच गोलमेज परिषदेचे यशस्वी आयोजन झाले. या परिषदेत भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया गणराज्य, मेक्सिको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, तुर्की आणि युनायटेड किंगडमसारख्या जगातील प्रमुख राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी गटिंग सहभाग नोंदवला. या परिषदेत प्रामुख्याने अन्नसुरक्षा, ऊर्जा सुरक्षा, हवामान बदलाचे आव्हान, आर्थिक स्थिरता, डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास आणि महिलांच्या विकासाला चालना देणे यांसारख्या अत्यावश्यक विषयांवर विस्तृत चर्चा झाली. या महत्त्वपूर्ण विचारमंथनात दक्षताने भारताची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली.
दक्षताचे मूळ गाव संगमेश्वर तालुक्यातील मठधामापूर असून, तिचे वडील हे नोकरीच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून देवरूखच्या केशवसृष्टी येथे वास्तव्यास आहेत. दक्षताने आपले प्राथमिक शिक्षण देवरूखमधील शाळा क्र. ४ मध्ये पूर्ण केले. कला शाखेची पदवी तिने देवरूखच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातून प्राप्त केली. उच्च शिक्षण पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयात झाले. यानंतर तिने बेंगलोर येथील अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटीमधून स्पेशल पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी मिळवली. तिच्यातील शैक्षणिक क्षमता आणि योगदानाला भारत सरकारने योग्य वेळीच ओळखले आणि तिची दिल्ली येथील आयआयटी शैक्षणिक प्रकल्पासाठी निवड केली. सध्या दक्षता दिल्ली येथे असोसिएट अॅडव्हायझर या महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत आहे.