पुणे, ता. ५ : ‘जिल्ह्यात अतिक्रमण करून अथवा बंद असलेले पाणंद, शिव रस्ते वापरास खुले करण्यासाठी जानेवारी महिन्यापासून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेत आतापर्यंत ७०४ किलोमीटर लांबीचे ५३८ रस्ते वापरास खुले केले आहेत. जिल्ह्यातील गाव नकाशाप्रमाणे अतिक्रमण व बंद झालेले असे रस्ते खुले करून घेण्याकरिता तहसीलदारांकडे नागरिकांनी या महिन्याअखेरपर्यंत अर्ज करावेत,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
मागील महिन्यात झालेल्या बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांनी पाणंद व शिव रस्ते वापरास खुले करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पाणंद, शिव रस्ते वापरास खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम जिल्हा प्रशासनाकडून आखण्यात आला आहे. तहसीलदारांकडे यापूर्वी रस्ते खुले करण्याबाबत प्राप्त अर्जानुसार रस्ते खुले करण्याची कार्यवाही केली जात आहे.
- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी
असे करा रस्ते खुले
- भूमिअभिलेख विभागाकडून ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी ग्रामीण गाडी मार्ग, पायमार्ग याबाबत गाव नकाशे ८ मेअखेर प्राप्त करून घ्यावेत.
- ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी त्यांना प्राप्त झालेल्या गाव नकाशात दर्शविल्याप्रमाणे गाडी मार्ग, पायमार्गाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अतिक्रमित व बंद असलेल्या रस्त्यांची यादी तयार करून त्याप्रमाणे संबंधित भोगवटाधारकांची यादी ९ ते १५ मे या कालावधीत तयार करावी.
- संबंधित भोगवटाधारक, सहधारक व सरपंच यांची एकत्रित बैठक घेऊन रस्ता खुला करण्याबाबत १३ ते २३ मे या कालावधीत प्रयत्न करावे.
- कार्यवाही करूनही रस्ता खुला झाला नसल्यास तहसीलदारांनी प्राधान्यक्रमाने रस्ता खुला करण्याबाबतची यादी दिनांक २२ ते ३० मे या कालवधीत तयार करावी. या यादीनुसार भूमिअभिलेख विभागामार्फत महिन्याच्या प्रत्येक बुधवारी प्राधान्यक्रमाने मोजणी करून घ्यावी.
- भूमिअभिलेख व पोलिस विभागाच्यामदतीने रस्ता खुला करावा.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
- तहसीलदारांकडून प्राप्त होणाऱ्या यादीप्रमाणे रस्त्यांची मोजणी संबंधित उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी मोफत करावी. याबाबत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पुणे यांना सूचना दिल्या आहेत.
- रस्ते खुले करताना कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलिस बंदोबस्त पुरवावा.
- रस्ते वापरास खुले केल्यानंतर त्यांच्या मजबुतीकरणासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी.