इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत सोमवारी (५ मे) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने आहेत. हैदराबादला होत असलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी कोलमडल्याचे दिसले. त्यांना हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने मोठे धक्के दिले.
त्यामुळे कसेबसे दिल्ली कॅपिटल्सने १०० धावा पार केल्या. ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्माने केलेली फटकेबाजी महत्त्वाची ठरली. दिल्लीने १३४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स प्रथम फलंदाजीसाठी उतरले. दिल्लीकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी करुण नायर आणि फाफ डू प्लेसिस यांची जोडी उतरली.
पण डावाच्या पहिल्याच चेंडूवर पॅट कमिन्सने सुरेख चेंडू टाकत नायरला फसवलं. चेंडू नायरच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक इशान किशनच्या हातात गेला. त्यामुळे करुण नायरला पहिल्याच चेंडूवर माघारी परतावे लागले.
त्यानंतर तिसऱ्या षटकात कमिन्स पुन्हा गोलंदाजीला आला. त्याने या षटकाच्याही पहिल्याच चेंडूवर फाफ डू प्लेसिसलाही तसंच चकवलं. डू प्लेसिसचाही झेल ३ धावांवर इशान किशनने घेतला. इतकंच नाही, तर कमिन्सने पॉवरप्लेमध्येच त्याचे तिसरे षटक टाकले.
तो डावाच्या पाचव्या षटकात पुन्हा गोलंदाजीला आला तेव्हा त्याने पहिल्याच चेंडूवर अभिषेक पोरेलला बाद केले. पोरेलचा ८ धावांवर असताना उंच उडालेला झेल इशान किशनने पकडला. त्यामुळे कमिन्सच्या तीन षटकात पहिल्याच चेंडूवर तीन विकेट्स गेल्या. त्यामुळे ५ षटकातच मोठे धक्के बसले.
दिल्लीची अवस्था त्यानंतर आणखी बिकट झाली. सहाव्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर अक्षर पटेलला हर्षल पटेलने बाद केले. त्याचा झेल ६ धावांवर कमिन्सने घेतला.
८ व्या षटकात फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलला १० धावांवर जयदेव उनाडकटने इशान किशनच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे २९ धावांच ५ विकेट्स अशी दिल्लीची अवस्था झाली होती.
त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि विपराज निगम यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संघाला ६० धावांचा टप्पा पार करून दिला. पण विपराज १८ धावांवर धावबाद झाला. पण नंतर स्टब्सला आशुतोष शर्माने आक्रमक खेळत चांगली साथ दिली.
त्यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. पण अखेरच्या षटकात आशुतोष शर्मा २६ चेंडूत ४१ धावा करून बाद झाला. त्याला ईशान मलिंगाने बाद केले. त्याचा अभिनव मनोहरने झेल घेतला.
दरम्यान, ट्रिस्टन स्टब्सने शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत संघाला २० षटकात ७ बाद १३३ धावांपर्यंत पोहचवले. स्टब्स ३६ चेंडूत ४१ धावांवर नाबाद राहिला. मिचेल स्टार्क १ धावेवर नाबाद राहिला.
हैदराबादकडून पॅट कमिन्सने ४ षटकात १९ धावाच खर्च करत ३ विकेट्स घेतल्या. तसेच जयदेव उनाडकटनेही चांगली गोलंदाजी करताना ४ षटकात १३ धावाच देत १ विकेट घेतली. याशिवाय हर्षल पटेल आणि ईशान मलिंगा यांनीही प्रत्येकी १ विकेट घेतली.