Ayush Mhatre ला IPL 2025 दरम्यान लॉटरी, चेन्नईचा फलंदाज सूर्यकुमारच्या नेतृत्वात खेळणार
GH News May 07, 2025 08:29 PM

आयपीएल इतिहासात 5 वेळा ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सची 18 व्या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली. त्यामुळे चेन्नईचं या हंगामातून पॅकअप झालं आहे. चेन्नईला आतापर्यंत एकूण 11 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. तर 9 सामन्यांमध्ये चेन्नईचा पराभव झाला आहे. याच चेन्नई टीममधील 17 वर्षीय युवा मुंबईकर आयुष म्हात्रे याने धमाका केला. आयुषने काही दिवसांपूर्वी आपल्या घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध आयपीएल पदार्पण केलं. आयुषने अवघ्या काही सामन्यांमध्ये धमाकेदार खेळी करत क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. अशात आता आयुषबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

आयुषवर आगामी टी 20 मुंबई लीग स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामासाठी मोठी बोली लावण्यात आली आहे. आयुषला ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ इस्ट या संघाने ऑक्शनमधून आपल्या गोटात घेतलं आहे. ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ इस्ट टीम मॅनजमेंटने 14 लाख 75 हजार रुपये मोजून आयुषला आपल्या टीममध्ये घेतलं आहे.

सूर्यकुमार यादव या स्पर्धेत ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ इस्टचं नेतृत्व करणार आहे.अर्थात आयुष म्हात्रे सू्र्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत खेळणार, हे स्पष्ट झालं आहे. या स्पर्धेतील तिसऱ्या हंगामासाठी मुंबईत 7 मे रकोजी 280 खेळाडूंवर बोली लावण्यात आली. या तिसऱ्या हंगामाला 26 मे पासून सुरुवात होणार आहे. आयुष व्यतिरिक्त सर्फराज खान याचा भाऊ आणि मुशीर खान याला एआरसीएस अंधेरी टीमने घेतलं. मुशीरला 15 लाख रुपये मिळाले. अंगकृष रघुवंशी याला सोबो मुंबई फाल्कन्स टीमने 14 लाख रुपयात आपल्यासह घेतलं. तसेच सूर्यांश शेडगे याला मुंबई नॉर्थ इस्ट टीमकडून 13 लाख 75 हजार रुपयांचा भाव मिळाला. तर तनुष कोटीयन याच्यासाठी नॉर्थ मुंबई पँथर्सने 10 लाख रुपये मोजले आहेत.

या स्पर्धेत अनेक दिग्गज खेळाडूही सहभागी होणार आहेत. क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी टीम इंडियातील स्टार्स मुंबईकर खेळाडू या स्पर्धेत आयकॉन प्लेअर्स असणार आहेत. प्रत्येक टीमचा 1 खेळाडू आयकॉन प्लेअर असणार आहे.

टीम आणि आयकॉन प्लेअर

  • ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट – सूर्यकुमार यादव
  • बांद्रा ब्लास्टर्स – अजिंक्य रहाणे
  • सोबो मुंबई फाल्कन्स – श्रेयस अय्यर
  • नॉर्थ मुंबई पँथर्स – पृथ्वी शॉ
  • एआरसीएस अंधेरी – शिवम दुबे
  • ईगल ठाणे स्ट्रायकर्स – शार्दुल ठाकुर
  • आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स – सर्फराज खान
  • मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्स – तुषार देशपांडे

8 संघ, 14 दिवस आणि 1 ट्रॉफी

दरम्यान या टी 20 मुंबई लीग स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. एकूण 14 दिवस स्पर्धेचा थरार रंगणार आहे. स्पर्धेला 26 मेपासून सुरुवात होईल. तर 8 जून रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल. स्पर्धेतील सर्व सामने हे वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येतील. तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा हा या टी 20 मुंबई लीग स्पर्धेचा ब्रँड अँबेसेडर असणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.