नवी दिल्ली : दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये भारतीय महिलांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या पतींना ठार मारले होते. यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्ष या मोहिमेत आणि त्यानंतर भारताने घडविलेले नारीशक्तीचे दर्शन जगभर चर्चेचा विषय ठरले आहे. विशेष म्हणजे देशाला या कारवाईची माहिती देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांतील दोन महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देखील खुद्द पंतप्रधान मोदी यांनी सुचविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या मोहिमेचा तपशीलवार वृत्तांत कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह या लष्करातील महिला अधिकाऱ्यांनी सादर केला. या दोघींच्या माध्यमातून केंद्राने धार्मिक ऐक्याचा संदेश दिला आहे.
सोफिया कुरेशी : धडाकेबाज अधिकारीकर्नल सोफिया कुरेशी या गुजरातच्या रहिवासी असून त्यांचा जन्म १९८१ मध्ये बडोद्यात झाला होता. बायोकेमेस्ट्रीत त्यांनी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. सोफिया यांचे आजोबा आणि वडिलांनी देखील लष्करामध्ये कर्तव्य बजावले होते. त्यांचे पती मेजर ताजुद्दीन कुरेशी हे देखील लष्करात अधिकारी आहेत. सोफिया यांचा १९९९ मध्ये भारतीय लष्करात प्रवेश झाला होता. पंजाब सीमेवरील ‘ऑपरेशन पराक्रम’मध्येही त्यांनी सहभाग घेतला होता. कर्नल सोफिया या भारताच्या पहिल्या पॅरा स्पेशल फोर्सेसच्या कमांडर आहेत.
व्योमिका सिंह : लढवय्या वैमानिकविंग कमांडर व्योमिका सिंह या हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून कार्यरत आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाल्या. त्यानंतर त्या हवाई दलामध्ये हेलिकॉप्टर पायलटही बनल्या. १८ डिसेंबर २०१९ मध्ये त्यांना फ्लाइंग ब्रँचमध्ये स्थायी कमिशन मिळाले होते. व्योमिका यांना अडीच हजार तासांहून अधिककाळ उड्डाणाचा अनुभव आहे. ‘मिराज-२०००’ व ‘राफेल’च्या माध्यमातून हवाई हल्ले करण्यात तरबेज असलेल्या व्योमिका सिंह या युद्ध मोहिमेत भाग घेणाऱ्या पहिल्या महिला पायलट आहेत.