सौम्य; पण ठाम संवाद
esakal May 08, 2025 10:45 AM

अश्विनी आपटे- खुर्जेकर

मैत्रिणींनो, तुम्ही हे कधी अनुभवलंय का, की तुम्ही अगदी मनापासून चांगुलपणानं कोणालातरी काहीतरी सांगायला गेलात; पण त्यातून गैरसमजच निर्माण झाले. एखादा प्रश्न विचारताना आपल्या बोलण्याच्या स्वराला थोडीशी धार आली, तर त्यामुळे आपण चिडून बोलतोय अथवा आपण समोरच्याला दोष देतोय असं समोरच्याला वाटतं. एखादी गोष्ट ठामपणे सांगितली, तर लोकांना ती आपल्या बोलण्यातली आक्रमकता वाटते. कधी गैरसमज होऊ नये म्हणून आपण सौम्य आणि संयम आणि बोललो, तर ती लोकांना उदासीनता वाटू शकते...पण म्हणजे नक्की काय चुकतंय?

आपण शब्दांचा विचार करून बोलत असतानाही गैरसमज होत असतील, तर त्याचा अर्थ आपला बोलण्याचा स्वर चुकतोय. अभ्यास सांगतो, की आपल्या बोलण्यामार्फत संवादापैकी फक्त ७ टक्के संवाद हा शब्दांद्वारे होतो, ३८ टक्के संवाद हा बोलण्याच्या स्वरांमुळे होतो आणि ५५ टक्के संवाद हा देहबोलीमुळे होतो.

आपण काय बोलतो हे जितकं महत्त्वाचं, तितकंच कसे बोलतो हेही तेवढंच महत्त्वाचं. अनेकदा आपले शब्द बरोबर असतात; पण त्यांचा उच्चार, बोलण्याची पद्धत आणि आवाजातील चढउतार चुकीचा संदेश पोचवतात. त्यामुळेच सौम्य, ठाम आणि परिणामकारक संवाद हे महत्त्वाचं कौशल्य आहे - विशेषतः महिलांसाठी, ज्यांना आपली मते मोकळेपणाने मांडायची असतात, पण नम्रताही टिकवायची असते.

मैत्रिणींनो, बोलणं ही आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. लोकांशी जोडलं जाण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी, नातेसंबंध निर्माण करण्यासाठी संवाद अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या संवादामधून तुमचा आत्मविश्वास, आत्मसन्मान आणि प्रभाव वाढवण्यासाठी तुम्ही सौम्य; पण ठाम संवाद करणं महत्त्वाचं आहे.

सौम्य बोलणं म्हणजे शांत, आदराने आणि समजूतदारपणे व्यक्त होणं. ठाम बोलणं म्हणजे स्वतःची मतं स्पष्टपणे, संकोच न करता; पण कोणालाही दुखवणार नाही अशा रीतीने मांडणं. या दोहोंचा समतोल राखणं म्हणजेच प्रभावी आणि आदरणीय संवादकौशल्य.

उदाहरणार्थ, तुम्ही दमलेले असताना कोणी काम सांगितलं, तर ‘आज मला बरं वाटत नाहीये, त्यामुळे आज मला थोडा आराम करायला आवडेल’ हे सांगणं, किंवा कामाच्या ठिकाणी कोणी जास्तीचं काम देत असेल, तर ‘मला इतर बरीच कामं करायची असल्यामुळे ही जबाबदारी मी घेऊ शकत नाही,’ असं सांगणं. तुमच्या शब्दांबरोबरच स्वराला खूप महत्त्व आहे. सौम्यपणे संवाद साधताना तुम्ही आक्रमक न होता, समोरच्याचा अनादर न करता बोलता आणि ठामपणे संवाद साधताना आपल्या भावना, मतं आणि गरजा इतरांपर्यंत आत्मविश्वासानं पोहोचवता.

स्वतःचं मत ठामपणे मांडा : ‘मला वाटतं...’ किंवा ‘माझ्या मते...’ अशा वाक्यरचनेसह मत स्पष्ट करा.

शांत आणि संयमी स्वर : ओरडून नाही, तर शांतपणे बोलल्याने तुमचं बोलणं अधिक परिणामकारक वाटतं.

ऐकून घ्या : समोरच्याचं पूर्ण बोलणं ऐकून मग उत्तर द्या.

शब्दांची निवड महत्त्वाची : ‘तू चुकलीस’ ऐवजी ‘हे असं झालं म्हणून मला असं वाटलं’ अशा प्रकारे बोला.

नकार द्या; पण आदराने : ‘माफ करा, मी ते करू शकणार नाही’, हे नम्रपणे आणि ठामपणे सांगा.

शरीरभाषा सुसंगत ठेवा : तुमच्या शब्दांमध्ये, बोलण्याच्या स्वरांमध्ये, देहबोलीमध्ये सुसंगतीची काळजी घ्या.

सौम्य; पण ठाम बोलण्याचे फायदे : गैरसमज कमी होतात, नातेसंबंध सुधारतात. आत्मसन्मान वाढतो, मतभेद शांतीपूर्ण पद्धतीने हाताळले जातात

सौम्य; पण ठाम बोलणं हे संवादाचं शक्तिशाली साधन आहे. ते स्त्रियांना घरात, नात्यांमध्ये, नोकरीत किंवा सामाजिक जीवनात स्वतःची ओळख ठामपणे मांडण्यास मदत करतं. त्यामुळे लक्षात ठेवा, सौम्यपणा ही दुर्बलता नाही, आणि ठामपणा म्हणजे उद्धटपणा नव्हे. दोन्हीचा योग्य वापर केल्यास तुम्ही तुमचं बोलणं प्रभावी बनवू शकता!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.