ऑपरेशन सिंदूर अखेर यशस्वी झालं. कुणाच्या ध्यानीमनी नसताना भारताने अचानक पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला चढवला. दहशतवाद्यांचे अड्डे बेचिराख झाले. नऊ ठिकाणी केलेल्या या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. या घटनेमुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे. पहलगाममध्ये हल्ला करणं किती महागात पडू शकतं, याची प्रचिती आता पाकिस्तानला आली आहे. पण हा हल्ला म्हणजे सर्व काही नाहीये. ही तर सुरुवात आहे. पिक्चर अभी बाकी है… भारताने अजून पुढचा प्लान आखला आहे. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पाकिस्तानला निर्वाणीचा इशाराही दिला आहे.
भारताने अर्ध्या रात्री पाकिस्तानवर हल्ला केल्याने पाकिस्तान बिथरला आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका असं अमेरिकेने पाकिस्तानला बजावलं आहे. पण पाकिस्तान हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दात वॉर्निंग दिली आहे. सीमेपलिकडून कुठल्याही प्रकारचा आक्रमकपणा दाखवला तर त्याला अत्यंत कडक उत्तर दिलं जाईल, असा इशाराच अजित डोभाल यांनी दिला आहे. पाकिस्तानने सीमेवरून साधी गोळी जरी झाडली तरी पाकिस्तानला धडा शिकवायचा हे भारताने ठरवलं आहे. हाच भारताचा पुढचा प्लान असल्याचं डोभाल यांच्या विधानातून स्पष्ट होतंय.
यापूर्वी बालोकोट एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला होता. पण भारताच्या या हल्ल्यानंतर आसिम मुनीरची आर्मी घाबरलेली आहे. पाकिस्तानने पुन्हा चूक केली तर त्यांना सोडलं जाणार नाही, असं अजित डोभाल यांनी स्पष्टच सांगितलं आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सेना भारताला बदनाम करण्यासाठी प्रपोगंडा करत आहे. भारताने लष्कराच्या ज्या अड्ड्यावर हल्ला केला त्या परिसरात सामान्य नागरिक राहत असल्याचं पाकिस्तानचं म्हणणं आहे. तर, दुसरीकडे लश्कर ए तोयबाने एक व्हिडीओ जारी करून हे आमचंच हेड क्वॉर्टर असल्याचं म्हटलं आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ऑपरेशन सिंदूर म्हणजे युद्धाची कारवाई आहे. या कारवाईला उत्तर देण्याचा पाकिस्तानला अधिकार आहे. आम्ही जोरदार उत्तर देऊ, असं शरीफ यांनी म्हटलं आहे. तसेच शरीफ यांनी सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्याची घोषणाही केली आहे. भारताचा हा क्षणिक आनंद शाश्वत दु:खात बदलून जाणार असल्याची धमकीही त्यांनी दिली आहे. रात्रीच्या अंधारात भारताने भ्याड हल्ला केला. पाकिस्तान याचं उत्तर वेळ आणि जागा पाहून देणार असल्याचा इशाराही शरीफ यांननी दिला आहे.
तर पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार यांनीही एक पोस्ट केली आहे. भारताने हल्ला करून पाकिस्तानच्या संप्रभुतेचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे प्रादेशिक शांतता धोक्यात आली आहे. भारताची ही कारवाई संयुक्त राष्ट्र चार्टर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असल्याचा दावा डार यांनी केला आहे.