Rohit Sharma Test Retirement: रोहित शर्माचा निर्णय 'ते' घेतील! गौतम गंभीरने कालच दिलेले संकेत; असं नेमकं तो काय म्हणाला होता?
esakal May 08, 2025 05:45 AM

Gautam Gambhir’s statement on Rohit Sharma proves true

“सर्वांना माझा नमस्कार, मी हे सांगू इच्छितो की, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. पांढऱ्या रंगाच्या जर्सीत माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा सन्मान आहे. गेल्या काही वर्षांपासून मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी वन डे फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत राहीन," रोहित शर्मा ( Retire ) इंस्टाग्रामवर ही पोस्ट लिहिली अन् सर्वांना धक्काच बसला. पण, क्रिकेट जाणकारांसाठी हे धक्कादायक अजिबात नव्हतं, कारण रोहितचं वय अन् त्याचा हरवलेला फॉर्म... हे त्याला निवृत्ती घ्यायला भाग पाडतील हे सर्वांना माहीत होतं. ते आज घडलं, पण हे सहजासहजी घडलेलं नाही.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करण्याची टीम इंडियाला संधी होती. पण, घरच्या मैदानावर ते न्यूझीलंडकडून ०-३ असे हरले अन् गणित अवघड झाले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही भारताला मार खावा लागला आणि WTC Final चे स्वप्न भंगले. या दोन्ही मालिकेत रोहितच्या धावांची सरासरी ही जेमतेम १० इतकी होती. यावरून त्याचा फॉर्म किती खराब आहे, याची कल्पना येतेच.

भारतीय संघ जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. २० जूनपासून सुरुवात होतेय आणि या मालिकेतून भारतीय संघ WTC 2025-27 च्या पर्वातील प्रवासाची सुरुवात करणार आहे. निवड समितीने पुढचा विचार करून नवीन खेळाडूकडे नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांनी रोहित शर्माला कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय घेतला. निवड समितीने त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर रोहितने निवृत्ती जाहीर केली.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार निवड समितीच्या या निर्णयाला बीसीसीआयनेही पाठींबा दिला आहे. टीम इंडिया कसोटी क्रिकेटमध्येही संक्रमणाच्या टप्प्यात आहे. पण, रोहितला हटवण्यामागे हे एकमेव कारण नाही. त्याचा फॉर्म हे खरे कारण आहे. ३८ वर्षीय रोहितलाही वन डे क्रिकेटमध्ये खेळत राहायचे आहे आणि निवड समितीचा त्याला विरोध नाही. पण, मायकेल क्लार्कच्या ‘Beyond 23’ शी बोलताना रोहितने इंग्लंड दौऱ्यासाठी उत्सुक असल्याचे म्हटले होते.

काल म्हणजे बुधवारी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानेही रोहितच्या भविष्याबाबत मत व्यक्त केले होते. तो म्हणालेला की, संघ निवडणे हे मुख्य प्रशिक्षकाचे काम नाही, हे तुम्ही सुरुवातीला लक्षात घ्या. ते निवड समितीचे काम आहे. मुख्य प्रशिक्षक फक्त सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडूंची निवड करतो. जोपर्यंत विराट कोहली व रोहित शर्मा दमदार कामगिरी करत आहेत, तोपर्यंत ते संघाचे सदस्य असतील. तेव्हा कुठून सुरुवात करायची आणि कुठे थांबायचे हे त्या व्यक्तीच्या निर्णयावर अवलंबून आहे. यात प्रशिक्षक, निवड समिती आणि काहीच सांगत नाही. तुम्ही ४०व्या वर्षीची कामगिरी करत असाल तर मग खेळण्यास काहीच हरकत नाही. तुम्हाला कोण थांबवणार?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.