पण तसं तोंडानं, म्हणणार कोण?
राजाला खरं, सांगणार कोण?
सगळे म्हणत होते, वाहवा! वाहवा!
किती सुंदर पोशाख! सुंदर राजा पाहावा
तेवढ्यात एक, छोटा मुलगा आला
होता गोरा गोरा, आणि गोंडस गोबरा!
त्याला राजा, जेव्हा दिसला
टाळ्या वाजवून, लगेच म्हणाला...
तो मुलगा काय म्हणाला ते शेवटी सांगेनच! आजची आपली गोष्ट म्हणजे मुळात एक मोठी कविताच आहे. कवितेतून सांगितलेली एक राजाची गोष्ट. आजवर आपण किती तरी राजांच्या गोष्टी ऐकल्या-वाचल्या आहेत. पराक्रमी राजांच्या गोष्टींपासून ते आळशी राजापर्यंत, पण आपल्या या गोष्टीतला राजा म्हणजे जरा अजबच आहे!
या राजाला कपड्यांची भारी हौस! कापडाचे अनेक व्यापारी दरबारात येत असत. दिवसा येत, रात्री येत, रोज येत. या व्यापाऱ्यांचा खूप फायदा होत असे, कारण कापड समोर आलं की, राजाने ते विकत घेतलंच म्हणून समजा! मखमल, रेशीम, ढाक्क्याचे मलमल, भरजरी किती तरी कापडं राजाजवळ होती. तरीसुद्धा त्याचं समाधान होईना! अजून अजून कपडे हवेत असं त्याला वाटायचं.
प्रजेला आता जरा शंका येऊ लागली की, आपल्या राजाला वेडबीड तर लागलं नाही ना? राजाचं हे कापडवेड दोन गुंडांच्या कानावर गेलं. त्यांना एक नामी युक्ती सुचली आणि ते पोहोचले राजाच्या दरबारात. राजाला म्हणाले, 'आम्ही कुशल विणकर आहोत.
अत्यंत कुशलपणे आम्ही कापड विणतो! सोन्याच्या अतिबारीक तारांपासून झालेल्या तलम, सोनेरी कापडावर चांदीची असते नक्षी आणि फुलांनासुद्धा लाजवतील असे असतात रंग! पण याहूनही एक खासियत अशी जी जगात कुठेही शोधून सापडणार नाही. ती म्हणजे -
त्यालाच आमचं कापड दिसेल
ज्याला ज्याला अक्कल असेल'
झालं! त्यांच्या या बोलण्याचा राजावर अपेक्षित असा परिणाम झाला! परिणाम कसला जादूच म्हणा ना! राजाने पुढच्याच क्षणी त्यांना हवं तेवढं सोनं, चांदी आणि काम करण्यासाठी एक मोठा महाल देऊ केला. त्या धूर्त गुंडांनी लगेच त्याचा ताबा घेतला आणि काम पूर्ण होईपर्यंत त्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही त्या महालाच्या आत यायला मनाई केली. दुसरा दिवस उजाडला. राजाने वजीराला कापड बघून यायला सांगितलं. वजीर महालात जाऊन बघतो तर काय!
विणकामाची चौकट रिकामीच, तरीही विणकरांची जोडी मात्र कामात मग्न! महालातलं सोनं, चांदी गायब! गुंडांनी अगदी अदबीने विचारलं, 'मोरपंखी रंगाचं, सोन्याची नाजूक नक्षी असलेलं कापड आपल्याला पसंत पडलं ना?' प्रश्न ऐकून वजीर चक्रावून गेला.
‘कापड दिसत नाही म्हणावं, तर आपल्याला अक्कल नाही असा त्याचा अर्थ होईल!’ खूप विचार करून शेवटी वजीराने त्या कापडाची वारेमाप स्तुती केली. वजीराच असा गोंधळ उडलेला पाहून इकडे या विणकरांनी म्हणजे गुंडांनी एकमेकांकडे बघून डोळे मिचकावले!
दरबारात जाऊन मग वजीराने कापडाचं रसभरीत वर्णन केलं! ते ऐकल्यावर भारावून गेलेले सगळेच दरबारी ते अभूतपूर्व कापड बघायला गेले पण हे काय? ना वजीराने सांगितलेली फुलं दिसली, ना फुलांचे गुच्छ! ना भरलेली चौकट, ना कापड! सगळे हैराण झाले! कोड्यात पडले, पण तरीही सगळे जण फक्त स्तुती करत होते कापडाची.
आता वेळ आली राजाची! राजा उत्सुकतेने महालात येऊन पोहोचला. तो डोळे चोळून चोळून पाहू लागला! पण कापड काही दिसेना, सोनं-चांदी सापडेना! विणकरी होते, उभे धागे विणत होते, आडवे विणत होते, पण धागे नजरेला दिसेना! राजा मोठ्या पेचात पडला! ‘कापड दिसत नाही म्हटलं, तर मला अक्कल नाही असं होणार! मलाच अक्कल नाही म्हटलं, तर मला राजा कोण म्हणणार? माझ्या प्रजेच्या मनात माझ्याविषयी काय आदर राहणार? सगळीकडे छी-थू होणार!’
अखेरीस राजाने ‘हे कापड अवर्णनीय आहे. आता या कापडाचे कपडे शिवावेत, विलंब करू नये!’ असा निर्णय दिला. हे ऐकून गुंडांनी हुश्श म्हणून तिथून काढता पाय घेतला आणि पुढची जबाबदारी येऊन पडली शिंप्यावर. शिंप्यांने तर गुंडांपेक्षा कहर केला! त्यानेसुद्धा मग नसलेल्या कापडाचं माप घेतलं, त्या कापडावरून कात्री चालवली, हवेलाच सुई टोचत, त्याने शिवलेसुद्धा कपडे - सलवार, झब्बा आणि जाकिट!
आरशासमोर उभे राहून शिंप्याला माप घेऊ देणाऱ्या अतरंगी राजाचं, दोन चतुर गुंडांचं, बावरून गेलेल्या वजीराचं गंमतीशीर आणि बोलकं चित्रण केलंय ऑड्रे कुमार यांनी. ही कथा कमला बकाया यांची असून, याचा मराठी अनुवाद शोभा भागवत यांनी केला आहे. हे पुस्तक कजा कजा मरू प्रकाशन गरवारे बालभवन यांनी प्रकाशित केलं आहे.
मग अशा प्रकारे नसलेल्या कापडाचा, न दिसणारा पोशाख शिवून तयार झाला! राजाच्या वाढदिवशी नजराणा म्हणून हा नवा पोशाख घालायचा आणि तो प्रजेला दाखवायला म्हणून पायीच एक मिरवणूक काढायची असं त्याने ठरवलं. ‘बघू तरी आपल्या राज्यातल्या किती लोकांना अक्कल आहे आणि किती जण बेअक्कल आहेत!
अक्कल नसलेले लगोलग या राज्यातून काढून टाकले जातील’ असा त्याने मनाशी विचार केला. निघाली की शाही मिरवणूक! दरबारी सरदार, मध्ये राजा आणि पुढे त्याचा बँड बाजा! राजाला बघायला गर्दी उसळली! सगळ्यांचे डोळे विस्फारले! सगळ्यांनी तोंडाचा आ वासला! कोणता पोशाख? कसली मिरवणूक? अहो हा तर तमाशा आणि आमचा राजा तर निव्वळ नागडा!
पण तसं तोंडाने म्हणणार कोण??
राजाला खरं सांगणार कोण??
हां! एक जण होता. डोळस आणि हिंमतवाला! तोच गोंडस गोबरा लहान मुलगा. त्याने राजाला पाहिलं मात्र, तो जोरजोरात टाळ्या वाजवून, हसत म्हणाला, 'राजा नागड धुय्या! नागड धुय्या राजा!' आपल्या छांदिष्टपणामुळे स्वतःचं हसं करून घेतलेला आणि खजिना उधळून टाकलेला राजा, त्याला आरसा ना दाखवता त्याच्या ‘हो’ला ‘हो’ करणारा दरबार, नागडं सत्य लख्ख दिसत असतानाही आपल्या मर्जीने आंधळेपणा स्वीकारणारी प्रजा - यांपैकी नक्की बेअक्कल कोण? हा असा लहरी माणूस राजा झालाच कसा हा एक प्रश्न आहेच, पण आपल्याला राजा निवडून देण्याची मुभा असताना, राजाची निवड करताना त्या लहान मुलासारखा डोळसपणा आणि धीटपणा हवा हे मात्र नक्की!