साहित्यिकांच्या कर्तृत्वाचा वेध
esakal May 11, 2025 09:45 AM

- दीपाली दातार, editor@esakal.com

‘गमभन’ प्रकाशनाच्या वतीने निवडक साहित्यिकांचे योगदान अधोरेखित करणारा लेखसंग्रह म्हणजे ‘साहित्य नक्षत्रे’. नेटकी मांडणी आणि लेखांसह दिलेली साहित्यिकांची छायचित्रे यामुळे त्याचे अंतरंगसुद्धा उठावदार झाले आहे.

लेखिका डॉ. मेधा सिधये यांनी कथा, कादंबरी, काव्य, नाटक, वैचारिक लेखन अशा बहुविध प्रकारांत लेखन करणाऱ्या २७ साहित्यिकांच्या साहित्यसेवेचा आस्वादक आणि अभ्यासपूर्ण परामर्श या लेखनाच्या निमित्ताने घेतला आहे.

कुणाला वाटेल या लेखकांविषयी गुगल केल्यास यांची सहजच माहिती मिळेलच की! पण ठोकळेबाज माहितीच्या पलीकडे जात, त्यांच्या लेखन कर्तृत्वाबरोबरच काळाच्या मितीवर आणि समकालीन लेखकांच्या तुलनेत ते लेखन तपासत, क्वचित आठवणी, साहित्यिक संदर्भ देत अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिलेले हे लेख असल्यामुळे साहित्यप्रेमी वाचकांना, साहित्याच्या अभ्यासकांना, पलीकडचे काही गवसल्याचा आनंद हे पुस्तक देते आणि त्यामुळेच त्याचे मोल अधिक वाटते.

सिधये यांना साहित्याची आणि साहित्यिकांची सखोल जाण आहे. त्यामुळेच लेखकांविषयीची खरीखुरी माहिती, त्यांचे उचित योगदान, त्यांच्या लेखनवैशिष्ट्यांसह वाचकांना देण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.

मराठी काव्यपरंपरेतील महत्त्वाचे कवी अर्थात, केशवसुत, बालकवी, विंदा, तसेच विनोदी लेखन परंपरेतील कोल्हटकर, अत्रे, गंगाधर गाडगीळ, नाट्य परंपरेतील खाडिलकर, गडकरी, विजय तेंडुलकर, तसेच, कादंबरीकार ना. सी. फडके, कथालेखक दि. बा. मोकाशी, विदुषी दुर्गाबाई भागवत, समीक्षक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व. दि. कुलकर्णी, के. र. शिरवाडकर यांच्यावरचे लेख अप्रतिम उतरले आहेत.

एक हजार शब्दांच्या काटेकोर मर्यादेत या प्रतिभावंतांवर लिहिताना त्यात सर्वसमावेशकता हा गुण असणे कठीण आहेच; पण त्यांचे ओझरते आणि नेमके दर्शन घडवणे तरी सोपे कुठे आहे? लेखिकेने ते आव्हान मात्र लीलया पेलले आहे.

के. र. शिरवाडकर यांच्या विद्वत्तेवर, व्यासंगावर भाष्य करताना, ‘काही ठिकाणी त्यांचे विचार पटत नाहीत, मार्क्सवादी विचारसरणीमुळे कुठे कुठे विसंगती आढळते,’ याचाही ही लेखिका नम्र, समंजस उल्लेख त्यांच्याविषयी आदर राखत करते. आणखी काही लेखातही तशी उदाहरणे सापडतात. केवळ गौरवपर भाष्य न करता अशा पद्धतीने परामर्श घेतल्यामुळे वाचकाला लेखकाच्या अनेक बाजू दिसण्यास मदत होते.

अभ्यासपूर्ण भाष्य करताना तर्ककठोर समीक्षेच्या अंगाने लिहिलेले हे लेख नाहीत किंवा हा केवळ त्या लेखकांचा बाळबोध परिचयदेखील नाही. प्रेमादराने आणि तटस्थपणे लेखकांचे साहित्यिक व्यक्तिमत्त्व वाचकांच्या ओंजळीत देण्याचा लेखिकेचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. लेखिका प्रस्तावनेत म्हणते त्याप्रमाणे समीक्षेच्या अंगाने जाणारा हा डोळस रसास्वाद आहे.

पुस्तकाचे नाव : साहित्य नक्षत्रे

लेखिका : डॉ. मेधा सिधये

प्रकाशन : गमभन प्रकाशन, पुणे

(०२०- २४४५८१४१, ९८२३१०५४५७)

पृष्ठे : १५२ मूल्य : २५० रुपये.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.