निवृत्ती व्हावी सन्मानजनक!
esakal May 11, 2025 09:45 AM

शैलेश नागवेकर - shailesh.nagvekar@esakal.com

आस्थापनांमध्ये निवृत्तीचं वय ठरलेलं असतं; पण प्रामुख्याने राजकारण कला क्षेत्र आणि खेळ यांमध्ये निवृत्तीसाठी वयाचे बंधन नसते म्हणूनच ४३व्या वर्षीही महेंद्रसिंग आयपीएल खेळतोय. आता तो खेळत राहण्याची कारणे वेगवेगळी आहेत; पण खेळात तरी निवृत्ती हा तसा संवेदनशील विषय आहे. अजून एक मालिका... अजून एक सामना... हा मोह संपत नसतो.

खेळाडूंच्या निवृत्तीबाबत दोन सूर उमटतात..

१) एवढ्यात कशाला निवृत्त झाला... अजून तेवढ्याच जोमाने खेळण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये!

२) झाला अखेर एकदाचा निवृत्त!

प्रत्येक खेळाडूने कोणत्या श्रेणीत जायचे हे त्याचे त्याने ठरवायचे असते.

खेळाडूही दोन प्रकारचे असतात. एक असतो महान खेळाडू आणि एक असतो सर्वसाधरण खेळाडू. सर्वसाधारण खेळाडू संघातून बाहेर गेल्यावर विस्मृतीतही जातात. कधीतरी अधिकृतपणे निवृत्ती जाहीर केली जाते हे समजतही नाही; पण महान खेळाडूंची निवृत्ती मोठ्या प्रमाणात चर्चेत येते. रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधील निवृत्ती याच प्रकारातील.

कसा फरक असतो पहा... टी-२० विश्वकरंडक जिंकल्यानंतर लगेचच विराट कोहलीसह रोहित शर्मानेही या प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. त्या वेळी कोणालाही त्याचे दुःख झाले नाही, कारण तो योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय होता, पण बुधवारी कसोटी क्रिकेटमधून अचानक जाहीर केलेली निवृत्ती म्हटलं तर धक्कादायक आणि म्हटलं तर अपेक्षित अशी होती. रोहित शर्माची कसोटी कारकीर्द संकटात असल्याचे आकडेवारीतूनच स्पष्ट होत होते. शेवटी निवड समिती काय किंवा संघ व्यवस्थापन काय, आकडेवारी हातात घेऊनच विचार करत असतात. गेले १५ डाव (यातील १० डाव तर भारतात झाले होते. बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिका त्यात) रोहित शर्माची सरासरी केवळ १०.९ धावांची. हे झाले खेळाडू म्हणून. कर्णधार म्हणून त्याने गेल्या सहा सामन्यांत (न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रत्येती तीन) पाच पराभव स्वीकारावे लागले. आता जर दोन्ही आघाड्यांवर अपयशांचा आलेख असा खाली आपटत असेल, तर कोणत्या निकषावर निवड समिती आणि संघ व्यवस्थापन रोहितने पुढे खेळत राहण्याचे समर्थन देईल?

खेळात तरी भूतकाळ नव्हे तर वर्तमानाला अधिक प्राधान्य दिले जाते. एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी या तिन्ही प्रकारात रोहितने कर्णधार म्हणून अद्वितीय कामगिरी केलीय, यात शंकाच नाही. कधी कधी प्रभावही (इम्पॅक्ट) अधिक विचारात घेतला जात असतो. रोहित याच श्रेणीतील. खास मुंबई शैलीतले त्याचे मैदानावरचे वावरणे आणि नेतृत्व करण्याची स्टाइल आहे. मैदानावर खेळाडूने चूक केली तर प्रसंगी एक-दोन शिव्या हासडायलाही तो मागे पुढे पाहायचा नाही; पण त्यातही त्याचे प्रेम असायचे. म्हणूनच यशस्वी जयस्वाल, नितीशकुमार रेड्डीसारखे नवे आणि विराटसारखे जवळपास समवयस्क खेळाडू रोहितचा आदर करतात. नवे खेळाडू तर रोहित भय्या म्हणून त्याला संबोधतात. रोहितने कर्णधार म्हणून एक वेगळेच वातावरण संघात निर्माण केले, यात शंकाच नाही. थोडसं मागे जाऊन अगोदरच्या कर्णधारांचा विचार करूया. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा. मॅचफिक्सिंगच्या विळख्यात अडकलेल्या क्रिकेटला सौरव गांगुली आणि त्याच्या टीमने बाहेर काढले. त्यानंतर धोनीचे युग तर यशाच्या शिखरावर नेणारे होते. विराट कोहलीचे एक जोशपूर्ण खेळाचे पर्व होते; पण या सर्वांहून

हटके रोहितचा प्रभाव होता, म्हणूनच त्याची निवृत्ती आजी माजी आणि विद्यमान खेळाडूंना आश्चर्चचकित करणारी होती, परंतु कितीही प्रभाव आणि लोकप्रियता निर्माण केलेली असली तरी कधीतरी थांबायचे असतेच. तो क्षण कोणता हे सर्वात महत्त्वाचे.

अशा महान खेळाडूंची निवृत्ती ही सन्मानाने आणि प्रत्यक्ष मैदानावर खेळून व्हावी हा मोठा मान असतो, क्रिकेटचे दैवत असलेल्या सचिन तेंडुलकरची निवृत्ती कधीही कोणीही विसरणार नाही; पण तेवढेच महान खेळाडू राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांना मात्र मैदानावर गार्ड ऑफ ऑनर मिळाला नाही, कारण परदेश दौऱ्यावर अपयशी ठरल्यानंतर काही महिन्यांनंतर त्यांनी निवृत्ती जाहीर केली होती. आता योगायोग पहा. आर. अश्विन हा भारताचा आणखी एक महान गोलंदाज. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अचानक निवृत्ती जाहीर केली आणि कसोटीच्या अखेरच्या दिवशी रोहितने पुढाकार घेत सर्व खेळाडू उभे करून गार्ड ऑफ ऑनर दिला होता; पण हीच मालिका आपलीही अखेरची मालिका ठरेल, असे रोहितला त्या वेळी वाटले नव्हते. रोहितला अजून खेळायचे होते; अन्यथा तोही ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून निवृत्त झाला असता.

आता रोहित केवळ एकदिवसीय प्रकारात खेळणार आहे. एकदिवसीय किंवा टी-२० या प्रकारांत जेव्हा विश्वकरंडक होत असतात, तेव्हा त्याचे अधिक महत्त्व प्राप्त होत असते. आता पुढच्या वर्षी टी-२० विश्वकरंडक आहे. त्यातून तर रोहित अगोदरच निवृत्त झाला आहे. एकदिवसीय विश्वकरंडक २०२७ मध्ये नियोजित आहे. त्या स्पर्धेपर्यंत खेळायचे तर रोहित ४० वर्षांचा झालेला आहे, कोण जाणे निवड समितीने नवी संघरचना करायची म्हटली तर रोहितला तोपर्यंत स्थान मिळणे कठीण असेल. एकूणच निवड समिती आणि बीसीसीआयचा विचार ओळखून रोहितने सन्मानाने आणि प्रत्यक्ष मैदानावर खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्णविराम द्यावा, हा त्याच्यासाठीच नव्हे तर त्याला मुंबईचा राजा संबोधणाऱ्या असंख्य चाहत्यांनाही समाधान देणारा असेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.