ऋचा थत्ते - rucha19feb@gmail.com
पत्र म्हणजे काय, तर मनाने मनाला घातलेली साद. आपल्या हातात आलेल्या पत्राला आपल्या जिवलगाचा स्पर्श झालाय आणि त्यावर फक्त आपल्यासाठी उमटलेली ही अक्षरंही त्याची आहेत, या गोष्टीनेही त्या काळी भरून येत असे. कलाकार आणि रसिकांमधील नातं दृढ करणारा सुंदर दुवा पत्रच होतं. मनाचा मनाशी संवाद म्हणजे पत्र. हा संवाद जपायला हवा.
एक दुपार ९२-९३ची! दाराबाहेरून ‘पत्र’ असा आवाज आला. लाकडी दरवाजाला पत्र टाकण्यासाठी असलेली पट्टी उघडली गेली आणि पोस्टकार्ड आत पडली. पोस्टमन काकांनी टाकलेली ही दोन्ही पत्र चक्क मला आली होती. आजी-आजोबांनीच लिहिली होती. पत्र लिहिण्याचं कारणही त्या वेळेनुसार तसंच खास होतं. आकाशवाणीवरून बालोद्यान कार्यक्रमात मी पहिल्यांदाच सहभागी झाले होते. रेडिओवरून नातीचा आवाज ऐकू आला याबद्दल वाटलेलं कौतुक त्यांनी पत्राने कळवलं होतं.
अशीच माझी आत्तेबहीण पत्र पाठवायची. तिचं पत्र निळ्या रंगाचं आंतरदेशीय. थोडं सविस्तर असायचं. तिच्याकडची सगळी खुशाली कळवून झाली, की प्रत्येकाची विचारपूस आणि मग शेवटी मोठ्यांना नमस्कार करून लहानांना आशीर्वाद! कुणी तरी आवर्जून आपल्यासाठी पत्र लिहिलंय ही भावनाच किती सुंदर आहे.
पोस्टमन काका. हो, त्यांना सगळे काकाच म्हणायचे. स्वतः ऊन, वारा, पाऊस झेलायचे; पण पत्र सांभाळायची, भरउन्हात सायकल चालवायची आणि हसतमुखाने पत्रं वाटायची. कधी पत्र, तर कधी लग्नपत्रिका, दिवाळीची भेटकार्ड अशाही गोष्टी यायच्या पोस्टाने. तसं पाहिलं, तर पत्र हे एक संपर्काचं साधन. फोन, ईमेल, मोबाईल यामुळे ते संपर्क करण्याचं काम खूप सोपं आणि अतिप्रचंड वेगानं झालं; पण तरीही पत्राचं वेगळेपण असं आहे नक्कीच.
फोन, मेसेजेस नंतर बहुतेकदा विस्मरणात जातात. ते कधी अघळपघळही असतात. पत्राला मात्र जागेची मर्यादा असते. त्यातच तो मजकूर मावला पाहिजे. बरं त्यातही पत्राचा मायना हा भाग आवर्जून पाळला जायचा. म्हणजे सर्वात आधी श्री किंवा कुलदैवताचं स्मरण, तारीख, स.न.वि.वि. अथवा सा.न.वि.वि. आणि पत्र मोठ्या व्यक्तीने लिहिल्यास अ.आ. त्यानंतर पत्रास कारण की अशी सुरुवात. शेवटी कळावे असं म्हणून स्वतःचं नाव. आणि अगदी तळाशी ता.क. म्हणजेच ताजा कलम. एरवी ताक घुसळून लोणी निघतं; पण पत्रातील हे ता.क.च पत्राचा गाभा असायचं. शाळेतही औपचारिक आणि अनौपचारिक पत्रलेखन हा स्वतंत्र प्रश्न असायचा. तेव्हाही याच पद्धतीनं काल्पनिक पत्रलेखन करायचो आणि मग पत्राची चौकट वगैरे आखून तिथेही काल्पनिक नाव - पत्ता वगैरे. आता लिहितानाच लक्षात आलं टीसीजीएन म्हणजे टेक केअर गुड नाईट वगैरे गोष्टींचा उगम या स.न.वि.वि. आणि ता.क.मधून तर झाला नसेल?
पत्रलेखनाचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या व्यक्तीचं हस्ताक्षर. स्वतःच्या हाताने पत्र लिहिल्यामुळे ती व्यक्तीच जणू भेटली आहे, असा भास होत असणार. परगावच्या नातेवाईक आणि परिचितांना पत्र लिहिणं ठीक; पण कुटुंबातील एखादी व्यक्ती कामानिमित्त परगावी राहात असेल, तर त्या पत्राची किती ओढ वाटत असेल, आपण कल्पनाही करू शकत नाही आणि आधी म्हटलं तसं पत्रात काय लिहिलंय यापेक्षाही पत्र आलंय ही गोष्टच अधिक मोलाची. याच विचारातून मनात चारोळी उमटली.
तुझ्या मनातली अक्षरं
आज पत्रात उमटली होती
पण वाचताच येईनात ती
माझी पापणी भिजली होती
आपल्या हातात आलेल्या या पत्राला आपल्या जिवलगाचा स्पर्श झालाय आणि त्यावर फक्त आपल्यासाठी उमटलेली ही अक्षरंही त्याची आहेत या गोष्टीने किती भरून येत असेल! ती अवस्था कदाचित अशीच असेल.
जुन्या चित्रपटांमध्ये तर पत्र वाचायला घेतलं, की ते पत्र लिहिणारं पात्रच त्या पत्रात दिसू लागायचं आणि त्या दृश्यात त्या पत्राचं अभिवाचन व्हायचं. पत्रलेखनाचा एक खास विभाग म्हणजे प्रेमपत्र. गुलाबी पत्र असंही त्याला संबोधलं जातं. शक्य झाल्यास खास अशा कागदावर रंगीत पेनाने नक्षीकामाची जोड देत व्यक्त केलेल्या गोड गुलाबी भावना म्हणजे प्रेमपत्र. कधी यात गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या जायच्या, तर कधी अत्तर लावलं जायचं. अर्थात ही सगळी कुठेतरी वाचलेली वर्णनं; पण त्यावरूनही शब्द सुचले
तुझे पत्र दरवळत असते भावनेच्या अत्तराने
तूही सुखावत असशील मी दिलेल्या उत्तराने
पत्रलेखकही उत्तराची वाट पाहत असतोच. पत्रोत्तराने ती संवादमालिका अखंड चालू राहते.
‘मैने प्यार किया’ची सुमन ही नायिका ‘पहले प्यार की पहली चिठ्ठी’ चक्क कबुतराकरवी पाठवते. पूर्वीच्या काळी राजे अशीच पत्र पाठवायचे. त्यामानाने अगदीच अलीकडच्या काळातल्या या सिनेमात ही कामगिरी कबुतरावर सोपवावी आणि त्यावर एक गाणंही असावं ही कल्पना मला तरी आनंद देऊन गेली.
आणि साधारण त्याच काळात असेल, टीव्हीवर चालू असलेल्या ‘सुरभि’ या कार्यक्रमात देशभरातून अक्षरशः ढिगाने पत्र यायची. एवढ्या पत्रांमधून आपलं पत्र वाचलं जाईल का, हे प्रेक्षकांचं कुतूहल त्यावेळेस किती विलक्षण असेल! पत्रव्यवहार आजही सगळ्या माध्यमात चालू असतोच; पण तो पोस्टकार्डचा ढीग विशेष लक्षात राहिला.
कलाकार आणि रसिकांमधील नातं दृढ करणारा सुंदर दुवा म्हणजे पत्र. पुलं-वपु यांच्यासारख्या अत्यंत आवडत्या साहित्यिक-सादरकर्त्यांना असं रसिक-वाचकांचं प्रेम भरभरून मिळालं. सुनीताबाईंचं प्रिय जी. ए., वपुंचं प्लेझर बाॅक्स, कवी अनिल व त्यांच्या पत्नी व साहित्यिका कुसुमावती देशपांडे यांचा पत्रव्यवहार संकलित असलेलं ‘कुसुमानील’. ही काही पत्रांना वाहिलेली पुस्तकं. अशी अजूनही उदाहरणं आहेत. ज्यामुळे पत्राला साहित्यिक मूल्य असल्याचं जाणवतं.
मी लहानपणी ‘पेन फ्रेंड’ संकल्पनाही ऐकली होती. माझ्या ओळखीत इंग्रजी माध्यमातील मुलांना पेनफ्रेंड होते. अर्थात परदेशातील आपल्या मित्राला वा मैत्रिणीला पत्र लिहायचं आणि वैचारिक-सांस्कृतिक देवाणघेवाण करत राहायची. हे प्रमाणही तुरळक असायचं. त्यामुळेच आता तर समाजमाध्यमांमुळे ही संकल्पना विस्मरणात जाण्याइतपत कालबाह्य झाली; मात्र ‘माझ्या आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं’ हा खेळ मात्र चांगलाच लक्षात आहे. अर्थात इथे पत्र म्हणून रुमाल वापरला जायचा.
देशविदेशातील स्टॅम्प जमवण्याचा छंद अनेकांना जडला असेल, तर तो पत्राच्याच निमित्ताने. इतिहासाच्या अभ्यासकांसाठी तर ‘पत्र’ किती अनमोल! आपणही इतिहासाची पानं मागे उलटत गेलो, तर समर्थांनी शिवरायांना लिहिलेलं पत्र किंवा चांगदेवांचं कोरं पत्र ही पत्र चटकन आठवतात! आणि चांगदेवांना पत्रोत्तर म्हणून ज्ञानदेवांनी पासष्ट ओव्यांद्वारे केलेला उपदेश अर्थात चांगदेव पासष्ठी. अशा पत्राचे तेज तर काय वर्णावे!
बघता बघता पत्राबाबत बरंच काही लिहिलं; पण पत्रलेखन मात्र आता घडत नाही; पण या निमित्ताने जाणवलं पत्र म्हणजे काय, तर मनाने मनाला घातलेली साद. मनाचा मनाशी संवाद. तो तरी जपायला हवा. आज हस्ताक्षरातील पत्र येत नसली, तरी अभिप्रायांचे, ईमेलचे स्क्रीनशॉट्स एखाद्या अल्बममध्ये साठवते वपुंच्या शब्दात सांगायचं तर माझ्यासाठी तो आधुनिक ‘प्लेझर बाॅक्स’च. कोणत्या ना कोणत्या रूपात हा संवादसेतू कायम राहावा आणि कधी न हरवावा याच सदिच्छेसह... पूर्णविराम!
(लेखिका निवेदिका आणि व्याख्यात्या आहेत.)