भारतीय महिला क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून तिरंगी वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेत भारतीय संघाने साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेवर बुधवारी (७ मे) दुसऱ्यांदा मात केली.
कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिका महिला संघाला २३ धावांनी पराभवाचा धक्का दिला. यासह भारताने तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. भारताने या मालिकेत साखळी फेरीत ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. अंतिम सामना रविवारी (११ मे) होणार आहे.
या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ३३८ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला ५० षटकात ७ बाद ३१४ धावाच करता आल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून लारा गुडऑल आणि तान्झिम ब्रिट्स यांनी सलामीला फलंदाजी केली. पण गुडऑलला ४ धावांवरच अमनज्योतने बाद केले. त्यानंतर तान्झिम आणि मिआन स्मित यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पण खेळपट्टीवर स्थिरावल्याचे वाटत असतानाच दोघीही बाद झाल्या तान्झिमने २६ आणि मिआनने ३९ धावांची खेळी केली.
त्यानंतरही नोंडुमिसो शांगसेने ऍनेरी डर्कसेनला चांगली साथ दिली होती. त्यांच्यातही अर्धशतकी भागीदारी झाली. पण नोंडुमिसो शांगसेही ३६ धावांवर बाद धाली. शिनालो जाफ्ताने २१ धावा केल्या. त्यानंतर ऍनेरी आणि कर्णधार क्लो ट्रायनने डाव पुढे नेला.
मात्र दक्षिण आफ्रिकेकडून कोणीही आक्रमक खेळू शकले नाही. आधीच्या फलंदाजांनी बरेच चेंडू वाया घालवले. त्यामुळे नंतर संघावरील दबाव वाढला. तरी डर्कसेन आणि ट्रायन यांनी अर्धशतके साकारली. पण डर्कसेन ८० चेंडूत ८१ धावा करून बाद झाली. तिने ५ चौकार आणि २ षटकार मारले. तिला अमनज्योतने त्रिफळाचीत केले.
शेवटच्या षटकात ट्रायनला दीप्ती शर्माने त्रिफळाचीत केले. तिने ४३ चेंडूत ६७ धावांवर बाद केले. तिने आक्रमक खेळ केला, पण तोपर्यंत उशीर झाला होता. तिने या खेळीत ४ चौकार आणि ५ षटकार मारले. नादिन डी क्लर्क १३ चेंडूत २ चौकार आणि १ षटकारासह २२ धावा करून नाबाद राहिली. सुन ल्युस २ धावांवर नाबाद राहिली.
अमनज्योत कौरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच दीप्ती शर्माने २ विकेट्स घेतल्या, तर श्री चरानी आणि प्रतिका रावल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
तत्पुर्वी, या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. भारताची सुरुवात चांगली राहिली नाही प्रतिका रावल १ धावेवर आणि हर्लिन देओल ४ धावांवर बाद झाली.
पण नंतर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधनाने डाव सावरला. मात्र हरमनप्रीतही २८ धावा करून बाद झाली. मानधनाला जेमिमाने साथ दिली होती. त्यांच्यात ८८ धावांची भागीदारीही झाली. मानधनाने अर्धशतक झळकावले. पण त्यानंतर ती बाद झाली. तिने ६३ चेंडूत ५१ धावांची खेळी केली.
यानंतर मात्र दीप्ती शर्माची भक्कम साथ मिळाली. दोघींनीही आक्रमक खेळताना शतकी भागीदारीही केली. या भागीदारीदरम्यान जेमिमाहने तिचे शतकही पूर्ण केले. अखेर तिला मसाबाता क्लासने ४३ व्या षटकात सुन ल्युसच्या हातून झेलबाद केले. जेमिमाने १०१ चेंडूत १२३ धावांची खेळी केली. तिने १५ चौकार आणि १ षटकार मारला.
त्यानंतर रिचा घोष आणि अमनज्योत कौर या स्वस्तात बाद झाल्या. रिचाने २० धावांची खेळी केली. अमनज्योतने ५ धावा केल्या. दीप्तीही शतक करेल असं वाटत होतं. पण ती शेवटच्या षटकात बाद झाली. तिने ८४ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह ९३ धावांची खेळी केली. शेवटच्या चेंडूवर श्री चरानी ६ धावांवर बाद झाली. त्यामुळे भारताला ५० षटकात ९ बाद ३३७ धावा करता आल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून मसाबाता क्लास, नादिन डी क्लर्क आणि नॉनकुलुलेको एलाबा यांनी प्रत्येकी २ विरेट्स घेतल्या. तसेच ऐनेरी डर्कसेन आणि कर्णधार क्लो ट्रायन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.