India-Pakistan War: महाराष्ट्राच्या प्रमुख ठिकाणांवर रेड अलर्ट, मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द
esakal May 09, 2025 03:45 AM

पाकिस्तानकडून गुरुवारी रात्री भारताच्या जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान येथील काही भागात ड्रोनने हल्ल्याचा प्रयत्न झाला. भारतीय जवानांनी पाकिस्तानचे हे सर्व प्रयत्न हाणून पाडले आणि आता भारतानेही लाहोरवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे India-Pakistan युद्ध पेटले आहेत. पाकिस्तानच्या या नापाक कृत्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यात बैठक सुरू आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणांवर रेड अलर्ट जाहीर केला आहे आणि मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या आहेत.

भारतीय लष्कराने पाकिस्तानचे तीन लढाऊ विमानंही पाडली आहेत. सीमेवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांना लष्कराच्या हवाई संरक्षण तुकड्यांनीही प्रत्युत्तर दिले. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी पाकिस्तानने जम्मूमधील एका हवाई तळावर रॉकेट डागले. तथापि, भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे आणि त्यांच्या शक्तिशाली हवाई संरक्षण यंत्रणेमुळे हा हल्ला पूर्णपणे हाणून पाडला गेला.

भारतीय लष्कराच्या आधुनिक S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने तातडीने कारवाई करत पाकिस्तानने डागलेल्या 8 क्षेपणास्त्रांना हवेतच उद्ध्वस्त केले. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्रांचे लक्ष्य जम्मू हवाई पट्टी होती, परंतु वेळीच प्रत्युत्तर दिल्याने मोठे नुकसान टळले.

भारताने काही तासांपूर्वी म्हटले होते की, जर पाकिस्तानने आता काहीही करण्याची हिंमत केली तर त्याला योग्य उत्तर मिळेल. असे असूनही, पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तो अयशस्वी केल्यानंतर, भारताने आता प्रत्युत्तराची कारवाई सुरू केली आहे. भारताच्या कारवाईनंतर लाहोरमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.