इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना गुरुवारी (८ मे) धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार होता. या सामन्याला पावसाच्या व्यत्ययाने साधारण तासाभर सुरू होण्याला उशीर झाला होता.
त्यानंतर पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णयही घेतला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना १०.१ षटकात १ बाद १२२ धावा केल्या होत्या. पण याचदरम्यान सामना अचानक थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
गुरुवारी पाकिस्तानकडून भारतातील विविध ठिकाणी ड्रोन हल्ले सुरु केल्यानंतर त्याला भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताकडून ८ ड्रोन पाडले असल्याची माहिती समोर आली आहे. अशात धरमशाला सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर आहे.
त्यामुळे सुरक्षेच्या कारणाने हा सामना थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. ब्रॉडकास्टरकडून याबाबत तांत्रिक कारण असल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडून सुरक्षेच्या कारणाने हा निर्णय घेतल्या असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. तसेच खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि ब्रॉडकास्टिंग टीम यांच्यासाठी बीसीसीआय विशेष ट्रेनची व्यवस्था करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सामना सुरू असतानाच अचानक स्टेडियममधील फ्लडलाईट्स बंद करण्यात आल्या होत्या. तसेच प्रेक्षकांना स्टेडियमही रिकामे करण्यास सांगण्यात आले आहे. खेळाडू, सपोर्ट स्टाफ, ब्रॉडकास्टिंग टीम या सर्वांनाही सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले आहे.
सध्या चिअर लीडरचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यात तिने याबाबत माहिती दिली आहे. तिने सांगितले आहे की सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ते धरमशालाच्या बाहेर जात आहेत. तसेच तिने अशीही आशा व्यक्त केली आहे की बीसीसीआय सर्वांची काळजी घेईल.
याशिवाय टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार राजीव शुक्ला यांनी सांगितले की 'आम्ही सर्वांना सुरक्षित घरी आणण्यासाठी उनावरून विशेष ट्रेनची व्यवस्था करत आहोत, ते ठिकाण धर्मशालेपासून फार दूर नाही. सध्या तरी सामना रद्द झाला आहे आणि स्टेडियम रिकामे करण्यात आले आहे. आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊन स्पर्धेच्या भविष्याबाबत निर्णय घेऊ. सध्यातरी खेळाडूंची सुरक्षा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे.'
तथापि, बीसीसीआयने त्वरित बैठक बोलावली असल्याचे समोर आली असून यात खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चर्चा होणार आहे. कारण, आयपीएलमध्ये भारतीय खेळाडूंसोबतच बरेच परदेशी खेळाडू खेळत आहेत.