वारंवार तुंबणाऱ्या सांडपाणी वाहिनीमुळे नागरिक त्रस्त
esakal May 09, 2025 11:45 PM

विजय गायकवाड : सकाळ वृत्तसेवा
पिंपळे गुरव, ता. ९ : येथील कवडेनगर, शिवनेरी इमारतीशेजारील गल्ली क्रमांक ४ येथे सांडपाणी वाहिनी तुंबली आहे. त्यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात या भागात ही समस्या वारंवार उद्भवते. प्रत्येकवेळी हे अस्वच्छ पाणी रस्त्यासह परिसरातील घरांमध्ये साचते. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे.
परिसरातील श्री स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ही सांडपाणी वाहिनी वारंवार तुंबते आहे. त्यामुळे नागरिकांचे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक बिकट होते. साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढते आणि डेंग्यू, मलेरिया अशा आजारांचा धोका वाढतो. या समस्येविषयी नागरिकांनी वारंवार महापालिकेकडे तक्रारी केल्या असूनदेखील आजवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. फक्त तात्पुरती स्वच्छता करून वेळ मारून नेली जाते, मात्र मूळ वाहिनीची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी अद्याप झालेली नाही.

प्रशासनाविरुद्ध नागरिकांच्या तक्रारी
‘‘या समस्येबाबत संपर्क साधला असता पालिकेचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तक्रार नोंदवूनही ‘‘काम लवकरच सुरू होईल’’ किंवा ‘‘पावसाआधी उपाययोजना केली जाईल’’ अशी साचेबद्ध उत्तरे दिली जातात. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई होत नाही’’, अशी तक्रार नागरिक करत आहेत.

कवडेनगर परिसरातील सांडपाणी वाहिनीची पाहणी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- शोएब शेख, उप अभियंता, ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय

सांडपाणी वाहिनी वारंवार तुंबण्याचे प्रकार रोखण्यासाठी महानगरपालिकेने ठोस उपाययोजना करायला हवी. मात्र, तसे होताना दिसून येत नाही. आमच्या परिसरात नवीन सांडपाणी वाहिनी टाकावी.
- पोपट कवडे, रहिवासी, पिंपळे गुरूव

सांडपाणी वाहिनीचे काम वेळेत न केल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महानगरपालिकेने तत्परतेने ही समस्या सोडवावी.
- संजय मराठे, सामाजिक कार्यकर्ते.

आमच्या घरामध्ये ड्रेनेजचे पाणी शिरते आणि त्याचा त्रास होतो. आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे सांडपाणी वाहिनीची दुरुस्ती तातडीने होणे आवश्यक आहे.
- रेणुका सणके, स्थानिक महिला

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.