Rising Temperatures in Nagpur Lead to Surge in Heatstroke Cases: उपराजधानीत उष्णतेची लाट सुरू आहे. नुकतेच उपराजधानीत २३० व्यक्तींवर उष्णतेचा परिणाम झाला असून उष्माघातासह उकाड्यामुळे अंगावर पुरळ येण्यापासून तर उष्णतेचा दाह आणि उष्णतेमुळे अस्वस्थ झालेले रुग्ण आढळले आहेत.
उपराजधानीत उकाड्यामुळे सर्वच वयोगटातील अनेक नागरिकांमध्ये ताप, ओकारी, अपचनासह उष्माघाताशी संबंधित तसेच उष्णतेचे त्रास वाढले आहेत. मेडिकल, मेयो, डागासह महापालिकेचे रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांत या रुग्णांची संख्या वाढत आहे. उष्माघाताच्या रुग्णांची नोंद करणे सर्व रुग्णालयांना बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने उष्णतेचा त्रास असलेल्या २३० व्यक्तींची नोंद केली आहे.
शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका, उष्ण वातावरणात घराबाहेर पड नका, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. उष्णतेचा त्रास बहुतांश शेतकरी, बांधकाम मजूर, वाहनचालक, पोलिस, सफाई कर्मचारी, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना झाल्याचे दिसून येते.
असे आढळले आहेत उष्णतेचे रुग्णउष्माघात - १
उष्णतेमुळे पुरळ - ५२
उष्णतेमुळे पेटके - ७२
थकवा - १०५
असा होतो उष्णतेचा त्रास- अस्वस्थपणा
- नीट चालता न येणे
- भोवळ येणे
- भ्रमिष्टपणा
- कधीकधी झटका येणे