अग्रलेख : खरे काय नि खोटे काय...?
esakal May 10, 2025 09:45 AM
अग्रलेख  :

कुरुक्षेत्रावर कौरवसेनेचे सेनापतिपद गुरुवर्य द्रोणाचार्यांकडे आले. ते अतिशय पराक्रमी धनुर्धर होते. अनेक दिव्यास्त्रांचे स्वामी. दुर्योधनाला दिलेल्या वचनाखातर तेराव्या दिवशी कोवळ्या अभिमन्यूचा चक्रव्यूहात घात केल्यानंतर द्रोणांनी पांडवसेनेचा अपरंपार संहार केला. अश्वत्थामा त्यांचा लाडका पुत्र, तोही कौरवांकडून रणांगणात उतरलेला होताच. अजेय द्रोणांना रोखण्यासाठी युगंधर कृष्णाने युक्ती करून भीमाकरवी अश्वत्थामा नावाचा एक गजराज लोळवला, आणि ते वृत्त द्रोणांच्या कानी जाईल, अशी व्यवस्था केली. वृत्त ऐकून विव्हल झालेल्या द्रोणांनी धर्मराज युधिष्ठिराला विचारले : ‘‘युधिष्ठिरा, तू कधीच असत्य भाषण करीत नाही, तूच सांग, माझा अश्वत्थामा खरंच गेला का?’’ त्यावर युधिष्ठिरानं ‘‘होय, गुरुवर, अश्वत्थामा हत: नरो वा कुंजरोवा… माणूस की हत्ती ते माहीत नाही..’’ अर्थात शेवटले शब्द त्याने फक्त पुटपुटले. दु:खावेगाने द्रोणांनी शस्त्रच टाकले. खरे तर ते होते सत्य-असत्याचे मिश्रण. पण त्यातून साधायचा तो परिणाम साधला गेला. एकूणच द्वापारयुगापासून कलियुगापासून हा प्रश्न चिरंतनच राहिला आहे- खरे काय नि खोटे काय?

युद्धाचे ढग जमू लागले की शस्त्रसामग्रीसोबत अफवा, असत्य, छद्म, कुटिलता, हे सारे काळेबेरेही वाहून येते. सरहद्दीवर सैन्य जिवाच्या कराराने लढत असते, आणि शहरगावातील सामान्य जीविते जीव मुठीत धरुन हे असले खोटेनाटे बघत, ऐकत बसतात. आत्ताच कानावर पडलेली बातमी खरी की खोटी? याची शहानिशा सामान्य माणसाने करावी तरी कशी? याची उत्तरे तारतम्यानेच शोधायची. दोन देशातले युद्ध फक्त फौजा कधीच लढत नसतात. कळत-नकळत नागरिकही त्यात ओढले जातात. या घटकेला आपण सारे नेमका हाच अनुभव घेतो आहोत.

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पहलगामच्या नृशंस हत्याकांडाला जबाबदार ठरलेल्या पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे नऊ आसरे उद्ध्वस्त केले. पण जन्मापासूनच शहाणपण हरवलेल्या पाकिस्तानच्या लष्करी ‘आकां’ना यातून धडा मिळाला नाही. त्यांनी उलट हल्ले सुरू केल्यामुळे उभय देशांमध्ये युद्धसदृश चकमकी सुरू झाल्या आहेत. या उग्र चकमकींचे रूप बदलून भयंकर युद्धात कधी होईल, हे कुणालाच सांगता येणार नाही. तोवर आपण विचारत राहायचे, खरे काय नि खोटे काय?

भारतीय फौजांनी थेट खोलवर, पाकिस्तानची सीमा ओलांडून शंभर किलोमीटर आत असलेला बहावलपूरमधला दहशतवादी तळ उडवला. त्यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी रात्री ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करून भारतातील किमान पंधरा शहरांना लक्ष्य केले. यामुळे माध्यमांवर वेगळेच युद्ध सुरू झाले. भारताची पाच विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पार्लमेंटमध्ये केला. अनेक वृत्तपत्रे आणि वृत्तसंस्थांनी तसे वृत्तही दिले, पण वास्तवात तसले काहीच घडले नसल्याने ते वृत्त मुकाटपणे मागे घेण्याची पाळी त्यांच्यावर आली.

भारताने इस्लामाबाद आणि लाहोरवर क्षेपणास्त्र डागले, कराची बंदरही उद्ध्वस्त केले, अशाही बातम्या पसरल्या. तशी छायाचित्रे आणि चित्रफिती समाज माध्यमांवर बोकाळल्या. ‘ब्रेकिंग’ बातम्या देण्याच्या स्पर्धेत टीव्हीवाहिन्याही कुठलीही शहानिशा न करता हाती आलेले वृत्त दणादण प्रेक्षकांपर्यंत पोचवत होत्या. ‘युद्धस्य कथा रम्या’ असतात हे खरे; पण त्यातल्या बव्हंशी खोट्या असतात, हेही तितकेच खरे! रात्रभर सुरू असलेल्या चकमकींमधील निम्म्याहून अधिक घडलेल्याच नाहीत, हे पुढल्या दिवसभरात स्पष्ट झाले. मुद्दा हा उरतो की सामान्य नागरिकांनी युद्धाच्या बातम्यांमधले तथ्य शोधायचे कसे? यातले खरे काय नि खोटे काय?

हे लक्षात घ्यावे लागेल की जशा युद्धाच्या बेफाम बातम्या आपल्याकडील माध्यमे देतात, तशाच त्या शत्रूराष्ट्राच्या मुलखातली माध्यमेही देत असतात. हा युद्धतंत्राचाच एक भाग असतो. सत्यापलाप हेही एक युद्धातले अमोघ अस्त्र असते. किंबहुना माहितीयुद्धातले सर्वांत प्रभावी अस्त्र म्हणजे चुकीची माहिती. चिनी ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने तर २००३ मध्येच आपल्या नियमावलीत ‘तीन युद्धप्रकार’ अधिकृतपणे स्वीकारले आहेत. जनमत युद्ध, मानसिक युद्ध आणि कायदेशीर युद्ध. रशियाही या प्रकारच्या युद्धांत आघाडीवर राहिला आहे. ‘जनरेटिव ॲडव्हर्सरियल नेटवर्क्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या छद्मयुद्धाच्या तंत्रात डीपफेक तंत्रज्ञान, कृत्रिम प्रज्ञा यांचा मन:पूत वापर करून आपल्या हवी तशी ‘हवा’ तयार करता येते.

इराकवर हल्ला चढवण्यापूर्वी सद्दामकडे अतिभीषण रासायनिक अस्त्रे असल्याचे कारण अमेरिकेने दिले होते. पण ते खोटे असल्याचे नंतर आढळले. २०२१ च्या मे महिन्यात इस्रायली फौजेनेही अशाच छद्मतंत्राच्या जोरावर ‘हमास’च्या पलटणींना एका बोगद्याच्या ठिकाणी गोळा व्हायला भाग पाडून घात केला होता. अशी अनेक उदाहरणे देता येतील. माहितीयुद्धाचे हे आधुनिक रूप भविष्यात भस्मासुरासारखे वागणार आहे, हे निश्चित. पण आज तरी याच्याविरोधात पुरेसे आंतरराष्ट्रीय कायदे-निर्बंध नाहीत.

ते होईपर्यंत युद्धकाळात जमेल तितके डोके ताळ्यावर ठेवून सतत स्वत:ला प्रश्न विचारत राहावे लागेल, की खरे काय अन् खोटे काय?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.