रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्यानंतर आणखी एक सीनियर खेळाडू नोटीस पिरियडवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. तो खेळाडू कोण हे आता समोर आले आहे. विराट कोहली ( Virat Kohli) यानेही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ( BCC) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले आहे. भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे आणि त्यासाठी येत्या काही दिवसांत कसोटी संघाची निवड केली जाणार आहे. त्याआधी विराटच्या या निर्णयाने गोंधळ उडाला आहे...
इंडियन एक्स्प्रेने दिलेल्या वृत्तानुसार विराटला बीसीसीआयने त्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे सांगितले आहे. 'त्याने त्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे बीसीसीआयला कळवले आहे. इंग्लंडचा महत्त्वाचा दौरा समोर आहे आणि विराटने त्याच्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा, असे बीसीसीआयने त्याला सांगितले आहे. त्याने आतापर्यंत या विनंतीवर त्याचे मत मांडलेले नाही,'असे सूत्रांचा हवाला देऊन या इंग्रजी वृत्तपत्राने लिहिले आहे.
रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर विराटने त्याचा निर्णय घेतला. भारतीय निवड समिती येत्या काही दिवसांत इंग्लंड मालिकेसाठीचा संघ निवडण्यासाठी भेटणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीपासून कोहली त्याच्या कसोटी भविष्याचा विचार करत असल्याचे कळतेय. पहिल्या कसोटीत शतक झळकावल्यानंतर त्याची कामगिरी खराब झाली होती.
विराटने त्याचा निर्णय बदलला नाही, तर भारताला इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघात मधल्या फळीत नवख्या खेळाडूची निवड करावी लागेल. लोकेश राहुल , शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल हे वरच्या क्रमांकावर असतील, तर रिषभ पंत खालच्या क्रमांकावर असेल. संघाला दोन अनुभवी खेळाडूंच्या मार्गदर्शनाशिवाय राहावे लागेल. ज्यांनी आतापर्यंत जवळजवळ ११ वर्षे कसोटी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. डिसेंबर २०१४ मध्ये विराट भारताचा कसोटी कर्णधार बनला आणि त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये रोहित कर्णधार बनला होता.
रोहितच्या निवृ्त्तीनंतर कसोटी संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत शुभमन गिल आघाडीवर आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढील हंगामाची सुरुवात इंग्लंड दौऱ्यावरूनच होणार आहे आणि निवड समितीला नव्या दमाच्या खेळाडूंकडे संघाचे नेतृत्व सोपवायचे आहे. ३६ वर्षीय कोहलीने १२३ कसोटी क्रिकेट सामन्यांत ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या आहेत. त्याने मागील पाच वर्षांत ३७ सामन्यांत १९९० धावा केल्या आणि त्याची सरासरी ही खूपच खाली आली होती. या कालावधीत त्याने फक्त ३ शतकं झळकावली होती.