सोलापूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२३ चा निकाल आज (शुक्रवारी) जाहीर झाला. त्यात स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत सोलापुरातील वैष्णवी राम गायकवाड हिने मुलींमध्ये राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
वैष्णवीचे प्राथमिक शिक्षण नु.म.वि. शाळेत तर माध्यमिक शिक्षण दमाणी विद्या मंदिर येथे झाले आहे. पुढे तिने अभियांत्रिकी शिक्षणासाठी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि त्याठिकाणी देखील अव्वल क्रमांक पटकावला होता. अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षी दि बाटू विद्यापीठात ती प्रथम आली होती. मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांची ती कन्या आहे. राम गायकवाड हे निलम नगर भाग- ३ येथील श्री धर्मण्णा सादुल प्रशालेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. वैष्णवीच्या यशाबद्दल सर्वच स्तरातून तिचे कौतूक होत आहे.