आईशीच हितगुज सारे!
esakal May 10, 2025 11:45 AM

स्वाती देवल - अभिनेत्री

'मी आधीची स्वाती भट-कडवाडकर. ‘कडवाडकर’ हे आडनाव लहानपणी मला फार विचित्र वाटायचं. नंतर कळलं, की आमचं मूळ गाव कारवारजवळचं कडवाड आहे. तिथूनच हे आडनाव आलं. आईला मी नेहमी विचारायचे, ‘‘अगं, तू याच नावाच्या माणसाशी लग्न का केलंस?’’ इथून आमच्या गप्पांना सुरुवात व्हायची! माझ्या आयुष्यातली पहिली स्त्री आणि खरी मैत्रीण म्हणजे माझी आई कांचन. ती माझ्यासाठी आई, बहीण, सखी आणि गुरू आहे. तिच्याशिवाय माझं बालपण म्हणजे अपूर्ण चित्र!

लहानपणी जेव्हा मनात काहीही यायचं- कुठलाही प्रश्न, शंका, भांडणाचा मुद्दा, तेव्हा मी सगळं आईलाच सांगायचे. बाबांशी बोलायची भीती वाटायची. माझे हट्ट, चिडचिड, रडारड हे सगळं आईच्या सहनशक्तीवर अवलंबून असायचं. आईने मला मोत्यांसारखं जपलं. ती नेहमी तिच्या कामात व्यग्र असायची; पण सगळ्या कामातही तिचं माझ्यावरचं लक्ष कधीच कमी झालं नाही. आज मी मागे वळून पाहते, तेव्हा आईचं महत्त्व अधिक जाणवतं. ती घरात सर्व काही मनात ठेवून जगत होती. तिचं हसणं, तिचं शांत राहणं, तिच्या डोळ्यांतलं दुःख सगळं आता कळतं. लहानपणी आम्ही तिचं ऐकत नव्हतो; पण आता वाटतं, तिला बोलू दिलं पाहिजे होतं, तिला विचारायला पाहिजे होतं... आई तिच्या भावंडांत सर्वांत मोठी होती. त्यामुळे लहानपणापासून जबाबदाऱ्यांचं ओझं तिच्यावर पडलं. तिला तिच्या अनेक इच्छा, स्वप्नं मागे ठेवावी लागली. पण कदाचित तिचं स्वप्न तिनं माझ्यात पाहिलं. म्हणूनच तिने मला शिकायला, लिहायला, वाचायला नेहमी प्रोत्साहन दिलं. आईने हळूहळू वाचनाची आवड माझ्यात निर्माण केली.

आई म्हणायची, ‘‘तुझ्या नावावरून लोकांनी मला ओळखलं पाहिजे.’’ या एका वाक्यामुळे मला प्रेरणा मिळाली आणि तिच्यासाठी मी स्वतःला घडवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आईमध्येही काही सकारात्मक बदल घडवण्याचा मी प्रयत्न केला. आई पूर्वी घरी वावरताना नेहमीच साडी नेसून काम करत असे. ती पारंपरिक पोशाखातच रमायची. पण आजच्या काळात वेळेप्रमाणे आणि गरजेनुसार पोशाखात बदल करण्यासाठी मी तिला प्रोत्साहित केलं. जेव्हा मी स्वतःसाठी नवीन साडी घेते, तेव्हा आईसाठीही घेते. मी तिला वेगवेगळ्या ‘ड्रेसिंग स्टाईल्स’ दाखवते. कधी तिच्यासाठी साडीऐवजी कुर्ता-पायजमाचा पोषाख घेते. सुरूवातीला ती संकोच करायची; पण आता तीही त्या पेहरावात किती सुंदर दिसते, हे तिच्या हास्यामधून जाणवतं. तिच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे. हे पाहून मला फार समाधान मिळतं.

माझा भाऊ थोडा खोडकर होता, त्यामुळे बाबा त्याला ओरडायचे. मात्र, आम्हा दोघांसाठी आई कायम बाबांशी बोलायची. घराच्या चार भिंतींत राहून समाजात कसं वागायचं हे आईने शिकवलं. आईला लहानपणी नृत्य आणि गायनाची आवड होती; पण आजोबांनी तिला त्या वाटेवर जायची परवानगी दिली नाही. ते स्वप्न तिने माझ्यात पाहिलं. तिच्या शब्दांमधून मला कलेची ओळख झाली. कला ही केवळ छंद नसते, तर ती तुमचं आयुष्य घडवू शकते, याचं महत्त्व तिनं पटवून दिलं. प्रेक्षकांसमोर आत्मविश्वासाने कसं उभं राहायचं, हे बाळकडू आईने दिलं.

आईमुळे मी धार्मिक, आत्मनिर्भर आणि कणखर झाले. तिने मला खंबीर राहायला शिकवलं; पण तिच्या शांत स्वभावाचा, निर्णयक्षमतेचा आणि सहनशक्तीचा गुण माझ्यात यावा असं मला वाटतं.

माझं अक्षर, माझं व्यक्तिमत्त्व, माझं कर्तृत्व या सगळ्याच्या मुळाशी माझी आई आहे. मला असं वाटतं की, मी दिसायला आणि वावरायला माझ्या आईसारखीच आहे. आज मी झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेमध्ये मंगलाची भूमिका साकारत आहे. तिच्या आत्मविश्वासामुळेच आज मी ठामपणे उभी आहे. खरंतर, माझ्या घरची जी लक्ष्मी आहे, ती म्हणजे माझी आई कांचन!

मी तिला जपण्याचा आणि जसं तिने मला घडवलं, तसंच मी माझ्या मुलाला घडवायचा प्रयत्न करते आणि करत राहीन.

(शब्दांकन : अलिना शेख)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.